चारुशीला कुलकर्णी, नाशिक
कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत बडतर्फ करण्यात आलेल्या राज्य परिवहन कर्मचाऱ्यांसाठी ‘कुटुंब सुरक्षा योजना’ आशेचा किरण ठरली आहे. योजनेच्या माध्यमातून बडतर्फ कर्मचाऱ्यांना नव्याने कामावर रुजू करण्यात येत आहे. नाशिक विभागातून आतापर्यंत या योजनेतून ४२ कामगारांना कामावर पुन्हा रुजू करण्यात आले आहे.
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद असणारे राज्य परिवहन मंडळ आपल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पालकाच्या भूमिकेत आहे. प्रवाशांना सेवा देताना कामात केलेल्या दिरंगाईबद्दल वाहक तसेच चालकांवर कारवाई करण्यात येते. काही वेळा पगार कापला जातो, काही दिवसांसाठी निलंबन होते. या चुका पुन्हा वारंवार होत असतील तर त्याच्यावर बडतर्फीची कारवाई होते. बडतर्फ करताना काही ठपका ठेवल्यास अशा व्यक्तींना पुन्हा दुसरीकडे काम करण्यास अडचणी येतात. कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणाचा त्यांच्या कुटुंबीयांना फटका बसतो. त्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. या पाश्र्वभूमीवर राज्य परिवहनने १ एप्रिल २०१६ पासून ‘कुटुंब सुरक्षा योजना’ सुरू केली आहे. कर्मचारी सातत्याने गैरहजर राहिल्याने बडतर्फ केले जातात. काही प्रवासी विनातिकीट प्रवास करत असतील तर त्यासाठी वाहकावरही कारवाई केली जाते. अशा बडतर्फ कर्मचाऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून पुन्हा कामावर रुजू होण्याची संधी दिली जात आहे. ज्यांनी वयाची ४५ वर्षे पूर्ण केलेली नाही, न्यायालयात त्यांच्याविषयी कुठलाही दावा नाही, ज्यांची प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा आहे, अशा कामगारांना या योजनेतून नव्याने नियुक्ती देण्यात येते. त्यांना या योजनेत मागील कुठल्याही सेवेवर दावा करता येत नाही.
नाशिक विभागात आतापर्यंत ५० वाहक-चालकांवर वेगवेगळ्या कारणांस्तव कारवाई करण्यात आली आहे. या योजनेतून ४२ जणांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आले असल्याची माहिती विभाग नियंत्रक नितीन मैंद यांनी दिली. यात गैरहजर तसेच अपहार करणारे आहेत. अपहारसंदर्भात न्यायालयात प्रकरण प्रविष्ट असल्याने सद्य:स्थितीत केवळ गैरहजर कर्मचाऱ्यांना कामासाठी संधी दिली जात आहे. यासाठी काही अटी-शर्ती ठेवण्यात आल्याचे मैंद यांनी नमूद केले.
बडतर्फ कर्मचाऱ्यांना संधी
राज्य परिवहनचे तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच कामगार हे घराबाहेर असतात. त्यात वाहक आणि चालक यांना काही तास सातत्याने प्रवास करावा लागतो. यामुळे विश्रांतीच्या काळात काहींना व्यसनाची सवय लागते. व्यसनामुळे काही वेळा ते कामावर गैरहजर राहतात. काही वेळा गर्दी, कामाचा कंटाळा अशा अन्य काही कारणांमुळे प्रवाशांकडून तिकिटाचे पैसे घेतले जात नाहीत, पैसे घेतले तर तिकीट दिले जात नाही. काही वेळा तिकिटामागे काही पैसे घेतले जातात. या गैरप्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी कामगारांवर बडतर्फची कारवाई होते. मात्र त्यांना पुन्हा संधी देण्यासाठी ‘कामगार सुरक्षा योजना’ सुरू केली आहे. योजनेअंतर्गत ४२ जण पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. अपहार करणाऱ्यांची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने अद्याप ते या योजनेपासून वंचित आहेत.
– नितीन मैंद (विभाग नियंत्रक, नाशिक विभाग)