जळगाव : व्यवसाय तसेच नोकरी सांभाळून आपल्यातील कलागुण जोपासणारे अनेक जण दिसून येतात. त्यानुसार, राजकारणाचा व्याप सांभाळून खास गाणे म्हणण्याचा छंद राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनीही जोपासला आहे. संधी मिळेल तेव्हा पदाचा बडेजाव न मिरवता अगदी सहजपणे गाणे गाणाऱ्या मंत्री सावकारे यांनी रविवारी भुसावळमध्ये एका कार्यक्रमात ‘बदन पे सितारे लपेटे हुए…’ हे गाणे गायिले. या गाण्यानंतर मंत्री सावकारे यांच्या मनातील ती कोण, अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगली.
भुसावळमधील स्नेहयात्री प्रतिष्ठानकडून स्नेहयात्री करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन दरवर्षी केले जाते. यंदाही या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. समारोपाच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मंत्री संजय सावकारे यांना गाणे म्हणण्याचा आग्रह झाला. तेव्हा फार आढेवेढे न घेता आपल्या गोड आवाजाने कराओकेच्या मदतीने त्यांनी ‘बदन पे सितारे लपेटे हुए…’ हे शम्मी कपूर यांच्यावर चित्रीत झालेले मोहंमद रफी यांच्या आवाजातील लोकप्रिय गाणे सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. गाणे गाताना त्यांनी धरलेला हळूवार ठेकाही सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. त्यांच्यातील गायकीला आणि साधेपणाला सर्वांनी भरभरून दाद दिली.
मंत्री सावकारे यांनी रविवारी भुसावळमध्ये एका कार्यक्रमात 'बदन पे सितारे लपेटे हुए…' हे गाणे गायिले.https://t.co/2jrmCKvB4K#Minister pic.twitter.com/vi9bGqbeOg
— LoksattaLive (@LoksattaLive) March 24, 2025
संजय सावकारे विधानसभेच्या भुसावळ मतदारसंघातून २००९ पासून अनुसूचित जाती राखीव जागेवर सातत्याने निवडून येत आहेत. २०१३ मध्ये तत्कालिन महाविकास आघाडीच्या सरकारच्या मंत्रीमंडळात कृषी व सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री म्हणून त्यांना पहिल्यांदा मंत्रीपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या नवीन सरकारमध्ये वस्त्रोद्योग मंत्री असलेल्या सावकारे यांनी मेकॅनिकलमध्ये पदविका घेतली आहे. आपली व्यस्त दिनचर्चा सांभाळून गाण्याची आवड जोपासण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. त्यासाठी भुसावळ शहरातील हौशी गायकांनी मिळून तयार केलेल्या कराओके गटात ते सहभागी झाले आहेत.