मालेगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर अपेक्षेप्रमाणे शिवसेना उध्दव ठाकरे गटाचा झेंडा फडकला आहे. सभापती पदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांची तर, उपसभापतिपदी राष्ट्रवादीचे विनोद चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली.
गेल्या महिन्यात पार पडलेल्या समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १४ जागा जिंकून ठाकरे गटाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. पालकमंत्री दादा भुसे गटाला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. ठाकरे गटाच्या या विजयामुळे भुसे गटाची समितीवरील सुमारे १५ वर्षाची सत्ता संपुष्टात आली. सभापती, उपसभापती पदाच्या निवडीसाठी नवनिर्वाचित संचालकांची विशेष सभा सहकार खात्याचे उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभापती व उपसभापती पदासाठी अनुक्रमे हिरे आणि चव्हाण यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने शेळके यांनी उभयतांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. सभेस ठाकरे गटाचे सर्व १४ आणि माजी सभापती बंडू बच्छाव यांच्या गटाचा एक असे १५ संचालक उपस्थित होते. भुसे गटाच्या तिन्ही संचालकांनी या सभेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.
हेही वाचा >>> नाशिक: सहा वर्षांपूर्वी बंद झालेल्या कराचे कवित्व सुरूच; मनपातील एलबीटी विभाग बंद करण्याची महाराष्ट्र चेंबरची मागणी
सभापतीपदी निवड झाल्यावर अद्वय हिरे यांनी भुसे गटाच्या सत्ता काळात बाजार समितीचा कारभार अत्यंत असमाधानकारक झाल्याची टीका केली. आगामी काळात शेतकरी, व्यापारी अशा सर्वच घटकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून कारभार केला जाईल. या बदलाची प्रचिती उद्यापासूनच दिसू लागेल,असा दावाही हिरे यांनी केला. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीच्या आवारात हिरे समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. निवडणुकीनंतर गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी व मिरवणूक काढत समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.
तेव्हा चिठ्ठीचा दुर्दैवी कौल,आता एकहाती सत्ता
यापूर्वी २०१६ मध्ये झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी अद्वय हिरे गटाला नऊ तर, भुसे गटाला आठ जागांवर विजय मिळाला होता. तिसऱ्या पॅनलचे एकमेव विजयी उमेदवार प्रसाद हिरे हे सभापती, उपसभापती या पदांच्या निवडणुकीत भुसे गटाला जाऊन मिळाले होते. तेव्हा सभापती पदासाठी अद्वय हिरे आणि प्रसाद हिरे यांच्यातील लढतीत दोघांना समसमान नऊ मते पडली. या स्थितीत चिठ्ठीद्वारे घेतलेला कौल प्रसाद हिरे यांच्या बाजूने गेल्याने अद्वय हिरे यांची सभापती पदाची संधी हुकली. दरम्यानच्या काळात परस्पर विरोधी असणाऱ्या भुसे-हिरे गटांनी एकत्र येत अविश्वास आणल्याने तत्कालिन सभापती प्रसाद हिरे यांना पायउतार व्हावे लागले. त्यानंतर अद्वय हिरे गटाच्या एका संचालकाला आपल्या गोटात खेचण्याची खेळी भुसे गटाने खेळली. या घडामोडींमुळे समितीवरील सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यात साहजिकच भुसे गट यशस्वी झाला होता. यावेळी मात्र एकहाती सत्ता मिळवून सभापतिपदी विराजमान झालेल्या अद्वय हिरे यांनी समितीमधील मागील काळातल्या राजकारणाचे सर्व हिशेब चुकते केल्याची चर्चा आहे.