नाशिक – जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना ३०० युनीट वीज मोफत मिळावी, या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मंगळवारी पक्ष कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे शालिमार परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. मागील काही दिवसांमध्ये वीज दरात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे. आर्थिक दुर्बल घटकांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. झोपडपट्टीतील रहिवासी, लहान हॉटेल व्यावसायिक, अन्य व्यावसायिक यांना हे दर परवडत नाहीत.
हेही वाचा >>> वटवृक्षाविषयी वादाची आदित्य ठाकरेंकडून दखल, मारहाणीची वृक्षप्रेमींकडून तक्रार
याविषयी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी भूमिका मांडली. वीज दरवाढीचा अनेकांना फटका बसला आहे. वीज देयके आवाक्याबाहेर जात असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील लोकांना त्याचा अधिक त्रास होत आहे. यामुळे जुन्या चाळी आणि झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना ३०० युनीट वीज मोफत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली असल्याचे बडगुजर यांनी सांगितले. ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.
हेही वाचा >>> नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी
शिक्षक निवडणुकीत पैशांचा अधिक वापर नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला. या निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराची निवड पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आली होती. त्याविषयी त्यांचा काही अभ्यास असेल. या निवडणुकीत पैशांचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला, असे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी नमूद केले.