विधानसभेच्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा रविवारी दुपारी शहरात जल्लोष करण्यात आला. पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला.महापालिकेसमोर ठाकरे गटातर्फे रविवारी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, महानगरप्रमुख शरद तायडे, महापौर जयश्री महाजन, पाचोरा येथील पक्षाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, मंगला बारी, उपमहापौर कुलभूषण पाटील, जिल्हा संघटक गजानन मालपुरे यांच्यासह पक्षासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करीत विजयोत्सव साजरा करण्यात आला.
हेही वाचा >>>जळगाव: सुषमा अंधारेंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पालकमंत्र्यांविरोधात ठाकरे गटाची निदर्शने
जिल्हाप्रमुख भंगाळे म्हणाले की, शिवसेनेचे पक्षचिन्ह गोठविल्यानंतरही विधानसभेच्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत खूप मोठ्या मताधिक्क्याने विजय झालेला आहे. भाजपला २२ हजार ५०० मते मिळालेली आहेत. भाजप म्हणजे नोटा. भाजपने नोटाचा प्रचार केला होता. नोटाला मतदान करा, असा प्रचार त्यांनी केला होता. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची हीच विजयाची घोडदौड मशालीच्या माध्यमातून आम्ही चालू ठेवू. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांत लटकेंच्या माध्यमातून मुहूर्तमेढ मिळालेली आहे. आता जिल्ह्यातील घराघरांत मशाल पेटविण्यात येईल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले.