नाशिक – महायुतीत अंतर्गत स्पर्धेमुळे अखेरपर्यंत वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजेंनी तब्बल एक लाख ६१ हजारहून अधिकच्या मताधिक्याने शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना पराभूत केले. भाजपच्या ताब्यातील शहरातील तीन विधानसभा मतदारसंघात गोडसेंना काहीअंशी दिलासा मिळाला. मात्र राष्ट्रवादीच्या ताब्यातील सिन्नर व देवळाली या ग्रामीण भागात मोठा हादरा बसला. काँग्रेसच्या ताब्यात असणाऱ्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वरने वाजेंना साथ दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक लोकसभा मतदारसंघात इगतपुरी वगळता उर्वरित पाचही विधानसभा मतदारसंघावर महायुतीचे वर्चस्व आहे. या परिस्थितीत ठाकरे गटाने मिळवलेला विजय लक्षणीय ठरला. त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाची साथ मिळाली. महायुतीत भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट या जागेसाठी आग्रही होते. त्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यात कालापव्यय झाला. विद्यमान खासदार गोडसेंना तिकीट मिळवण्यासाठी जंगजंग पछाडावे लागले होते. विलंब होत असल्याने उमेदवारीच्या स्पर्धेतून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी माघार घेतली होती. नाशिकची जागा धोक्यात असल्याचे लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारासाठी तीन, चार वेळा नाशिक दौरा केला होता. नाराजांची समजूत काढली. उद्योजक व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत चांगलाच जोर लावला होता. भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी दोन दिवस नाशिकमध्ये ठाण मांडून आमदारांसह माजी नगरसेवकांना कामाला लावत अधिकाधिक हक्काचे मतदान होईल, यावर भर दिला होता. तथापि, महायुतीचे हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. नाराज ओबीसी घटक महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडल्याचे दिसत आहे.

हेही वाचा >>>Lok Sabha Election 2024: दिंडोरीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांना धक्का; शरद पवार गटाची जोरदार मुसंडी

नाशिक मध्य, नाशिक पूर्व आणि नाशिक पश्चिम या भाजपच्या ताब्यातील विधानसभा मतदारसंघात गोडसेंना कमी-अधिक प्रमाणात आघाडी मिळाली. परंतु, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ताब्यातील सिन्नर व देवळालीतून अपेक्षित आघाडी मिळाली नसल्याचे शिंदे गटाचे पदाधिकारी सांगतात. लोकसभेच्या निकालाने महायुतीच्या सर्व आमदारांसमोरील लढाई आव्हानात्मक राहणार असल्याचे अधोरेखीत झाले. ठाकरे गटाचे वाजे हे मूळचे सिन्नरचे असून त्यांना सिन्नर विधानसभा क्षेत्रातून मोठे मताधिक्य मिळाले. तशीच स्थिती शेजारील देवळाली व इगतपुरीत राहिली. महायुतीच्या तुलनेत महिनाभर आधीच उमेदवारी जाहीर झाल्याचा पुरेपुर लाभ वाजेंनी घेतला. संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. नाशिक शहरावर अधिक लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे या तीन मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीत फारसे अंतर राहणार नाही, याची खबरदारी घेतली गेल्याने त्यांचा विजय सूकर झाल्याचे मानले जात आहे.

राजाभाऊ वाजेंना सहा लाखहून अधिक मते

नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना (६०३६६५) मते मिळाली. तर महायुतीचे उमेदवात हेमंत गोडसेंना (४४०८२९) मते मिळाली. वंचित आघाडीचे करण गायकर यांना (४६२६२) मते मिळाली. हजारो भक्त परिवाराच्या सहाय्याने जोरदार प्रचार करणारे शांतिगिरी महाराजांना ५० हजारांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यांना ४३ हजार ४५९ मते मिळाली. नोटाला ६०१३ मते मिळाली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray group dominates nashik made famous by chief minister nashik amy
Show comments