मालेगाव : शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) मालेगाव बाह्य मतदार संघातील उमेदवार अद्वय हिरे यांच्यावर सोमवारी दुपारी शहराजवळील सोयगाव भागात हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार ठाकरे गटाने केली आहे. या संदर्भात येथील कॅम्प पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद झालेली नव्हती.
मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेनेचे (एकनाथ शिंदे ) मंत्री दादा भुसे यांच्याविरोधात अव्दय हिरे अशी लढत होत आहे. सोयगाव येथील रिपाइंचे कार्यकर्ते दिलीप अहिरे हे आजारी असल्याने त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास हिरे हे त्यांच्या निवासस्थानी गेले होते. हिरे घरात असताना त्यांचे काही कार्यकर्ते घराबाहेर थांबले होते. यावेळी तिघा संशयितांनी आपल्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली, गोळ्या घालण्याची धमकी दिली तसेच वाहनावर दगडफेक केली,अशी हिरे यांची तक्रार आहे.
हेही वाचा…आयुक्तांकडून कन्या आश्रमशाळेतील सुविधांचा आढावा
आपण निवडणुकीतून माघार घ्यावी म्हणून पालकमंत्री दादा भुसे यांनी गुंडांकडून आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हिरे यांनी माध्यमांकडे केला आहे. पोलीस संरक्षण देण्याची मागणी करत आपल्या जीविताचे बरे वाईट झाल्यास त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही हिरे यांनी दिला आहे. पोलीस याप्रकरणी लक्ष ठेवून आहेत.
हेही वाचा…उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन, दिवाळी खरेदीच्या गर्दीने वाहतूक विस्कळीत
पाच वर्षे गायब असतात. केवळ निवडणुकीतच तोंड दाखवितात, असे म्हणत अद्वय हिरे यांच्या कार्यकर्त्यांना सोयगावमधील काही तरुणांनी केवळ जाब विचारला. त्यावरून किरकोळ बाचाबाची झाली. भुसे यांचा या प्रकाराशी कुठलाही संबंध नसताना हिरे यांनी वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला. हा शुध्द प्रसिध्दीचा प्रकार आहे, हे तालुक्यातील जनतेला माहीत आहे.
-ॲड. संजय दुसाने (जिल्हाप्रमुख, शिवसेना-एकनाथ शिंदे गट)