शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे ईडीच्या ताब्यात आहेत. शंभर दिवसांनंतर बुधवारी राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने शहरातील ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटत जल्लोष केला.
हेही वाचा >>>जळगाव : मराठी नामफलक नसल्याने ३५ दुकानांना दंड
मुंबई येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जूनमध्ये ईडीने अटक करून न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. न्यायालयाकडून जामीन मिळावा यासाठी राऊत यांनी अनेक वेळा अर्ज केला होता मात्र, त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येत होता. बुधवारी या प्रकरणात प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्याही जामीन अर्जावर निर्णय देण्यात आला. संजय राऊत यांचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला. दोन लाखांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. खासदार राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर शहरातील महापालिकेसमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटत जल्लोष करण्यात आला. यावेळी महिला आघाडीच्या पदाधिकार्यांनी फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हा संघटक गजानन मालपुरे, महिला आघाडीच्या मंगला बारी यांच्यासह पक्षाच्या विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणला होता.