सरदार कंपनीच्या सुपर फॉस्फेट खतामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या कंपनीचा राज्य परवाना निलंबित केला असला, तरी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई मिळावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कृषी अधिकार्‍यांकडे करण्यात आली.

हेही वाचा >>> नाशिक: ग्रामपातळीवर निरक्षरांचा शोध, नवभारत साक्षरता अभियान; सर्वेक्षण पंधरवड्यात पूर्ण करण्याची सूचना

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांच्या नेतृत्वात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी धरणगाव येथील तालुका कृषी अधिकार्‍यांशी भेट घेत निवेदन दिले. तालुका कृषी अधिकारी देशमाने यांच्याशी चर्चा केली. सहसंपर्कप्रमुख वाघ, चौधरी यांनी सांगितले की, जिल्ह्यासह धरणगाव तालुक्यातील भोणे, बिलखेडा, धरणगाव, गंगापुरी, पष्टाणे, निशाणे आदी गावांतील शेतकर्‍यांनी पावसाळी कपाशी पिकाला सरदार कंपनीचे सुपर फॉस्फेट खत दिले. त्यामुळे कपाशीची वाढ खुटणे, पोकळासारखा आकार होणे, मध्यभागी अंकुर न येणे, झाडे पिवळी पडणे, अशी लक्षणे दिसत आहेत. पूर्ण क्षेत्र खराब होत आहे. शेतकर्‍यांना जास्तीत जास्त भरपाई द्यावी, अशी मागणी केली. 

हेही वाचा >>> नाशिक: अल्प दरात विमान तिकीटाच्या आमिषाने भुर्दंड, दहा विद्यार्थ्यांच्या पालकांची फसवणूक

देशमाने यांनी, सर्व शेतकर्‍यांची तक्रार घेऊन शेतात पाहणी करून, कृषी अधीक्षकांना ताबडतोब अहवाल पाठवतो. संबंधित यंत्रणेकडून पंचनामे करून जास्तीत जास्त भरपाई कशी मिळेल, यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख जयदीप पाटील, शहरप्रमुख भागवत चौधरी, संतोष सोनवणे, गजानन महाजन, गोपाल पाटील, शरद शिरसाट, विलास पवार यांच्यासह यज्ञेश्वर पाटील, विलास पाटील, मनोहर पाटील (गंगापुरी) आदींसह बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Story img Loader