मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या गटाकडून उद्धव ठाकरेंच्या गटाला मोठा धक्का देण्यात आला आहे. नाशिकमधील संघटना अखंड ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे हे काही दिवसांनी नाशिकमध्ये सभा घेणार होते. त्याच्या पुर्वतयारीसाठी संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. ते नाशिकमध्ये असतानाच शिंदे गटाने ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातो. याआधी जून महिन्यात ५० आमदार फोडल्यानंतर नाशिकमध्ये ५० पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे या आकड्याच्या साधर्म्यावरुन आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपुर्वीच ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर नाशिकमध्ये हा दुसरा झटका शिंदे गटाने दिला आहे.
खोदा पहाड और चुहा भी नही निकला
मुंबईत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांचे स्वागत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “मागच्या सहा महिन्यात जे जे निर्णय घेतले, ते सर्वसामान्य माणसांसाठी घेतले. शेतकऱ्यांपासून, युवक, महिला, शिक्षक अशा प्रत्येक वर्गाचे प्रश्न सोडविले.आम्ही बॉम्ब फोडू म्हणाले, पण खोदा पहाड और चुहा भी नही निकला. विरोधकांनी असा आव आणला की, सरकारने खूप मोठा घोटाळा झालाय, पण हाती काहीच लागले नाही. विरोधकांनी आधी माहिती घेतली असती तर त्यांची अशी फसगत झाली नसती. एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या गटात प्रवेश करत आहेत, याचाच अर्थ आमचे काम त्यांना आवडत आहे. कुणीही कितीही आमच्यावर आरोप केले तरी आम्ही लोकांसाठी काम करत राहू.”
याआधी १२ नगरसेवकांनी शिंदे गटाला केला जय महाराष्ट्र
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले खासदार संजय राऊत हे संघटनात्मक बांधणीसाठी नाशिक दौऱ्यावर आहेत. याआधीही संजय राऊत नाशिकमध्ये येऊन गेले होते. ते गेल्यानंतर १२ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. नाशिकमध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे जानेवारी महिन्यात सभा घेणार होते, मात्र त्याआधीच शिंदे गटाने ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम केलेला दिसत आहे.
नरेश म्हस्के यांचे सूचक ट्विट
आज सकाळीच शिंदे गटाचे नेते आणि ठाणे मनपाचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी एक सूचक ट्विट केले होते. “आज पुन्हा एकदा उडणार आहे भडका, सपक झालेल्या डाळीला दिलाय आम्ही तडका” अशा आशयाचे ट्विट करुन त्यांनी ठाकरे गटाला डिवचले होते.