लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने लागू केलेल्या १५ टक्के भाडेवाढीविरोधात मंगळवारी शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) वतीने नाशिक शहरासह मनमाड, देवळा येथे आंदोलन करण्यात आले. ठक्कर बाजार आणि नवीन सीबीएस बस स्थानकासमोरील आंदोलनामुळे त्र्यंबक नाका परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
शहरातील आंदोलनाप्रसंगी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने भाडेवाढ रद्द करण्यासह परिवहन मंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या दिल्याने मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. काही शिवसैनिकांनी उभ्या असलेल्या बसच्या टपावर जाऊन घोषणाबाजी केली.
ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आंदोलनामागील भूमिका मांडली. राज्य परिवहनची बस सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. आधीच अनेक बसेसची अवस्था अत्यंत दयनीय आहे. रस्त्यात कुठेही त्या बंद पडतात. असे असले तरी प्रवासासाठी सर्वसामान्य जनता राज्य परिवहनच्या बससेवेलाच प्राधान्य देतात. प्रवाशांना चांगली सेवा देण्याऐवजी सत्ताधाऱ्यांकडून भाडेवाढ केली जात आहे. भ्रष्टाचाराने कळस गाठल्याने तोटा होत असल्याची जाणीव असतानाही त्याला आळा घालण्याऐवजी भाडेवाढ करणे हा कुठला न्याय, असा प्रश्न जिल्हाप्रमुख बडगुजर यांनी केला. लाडक्या बहिणींना देण्यात येणारे पैसे छुप्या पद्धतीने दुसऱ्या मार्गाने काढून घेण्याचा प्रकार आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशाराही बडगुजर यांनी दिला. या आंदोलनानंतर एन.डी.पटेल रोडवरील विभागीय कार्यालयात जाऊन भाडेवाढ मागे घ्यावी, या मागणीचे निवेदन विभागीय नियंत्रकांना देण्यात आले.
आंदोलनात सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, राज्य संघटक विनायक पांडे, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गीते, उपजिल्हाप्रमुख केशव पोरजे, महेश बडवे, सचिन मराठे आदी उपस्थित होते.
मनमाड, देवळ्यातही आंदोलन
राज्य परिवहन महामंडळाने प्रवास भाड्यात केलेल्या वाढीच्या निषेधार्थ मंगळवारी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे ) वतीने देवळा आणि मनमाड येथेही आंदोलन करण्यात आले. मनमाड शहर शाखेतर्फे बस आगारात घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी मनमाड स्थानकातील वाहतूक रोखून धरली. आंदोलकांनी दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करत निदर्शने केली. माजी आमदार जगन्नाथ धात्रक, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक, जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, संघटक संजय कटारिया, शहरप्रमुख माधव शेलार, नांदगाव तालुकाप्रमुख संतोष गुप्ता आदी उपस्थित होते. मागणीचे निवेदन आगार व्यवस्थापक विक्रम नागरे आणि शहर पोलीस प्रशासनाला देण्यात आले. देवळा येथे वाहतूक नियंत्रक भूषण आहेर यांना निवेदन देण्यात आले. भाडेवाढ सर्वसामान्यांना न परवडणारी आहे. सर्वसामान्य आधीच महायुती सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे त्रस्त असताना जीवनावश्यक सर्वच वस्तू महाग झाल्याने जनता आर्थिक संकटात सापडली आहे. त्यात बस प्रवास महागल्याने नाराजी असून भाडेवाढ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख सुनील पवार, तालुका संघटक प्रशांत शेवाळे, शहरप्रमुख विश्वनाथ गुंजाळ आदी उपस्थित होते.