नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाची हिंदू मते वळविण्याचे समीकरण मांडण्यात आले असून तसा ठरावांमध्येही उल्लेख करण्यात आला आहे.नाशिक येथे आयोजित भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आलेल्या ठरावांची माहिती राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी दिली. विविध विषयांवर भ्रम निर्माण करणारे राजकीय शुक्राचार्य मोठय़ा संख्येने सभोवताली असून त्यांच्यापासून जनतेने सावध राहण्याचा इशाराही भाजपने दिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी धोरण, राज्यात अवघ्या सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिलेली भरीव मदत याबद्दल मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या अभिनंदनाचा कृषी-सहकारविषयक ठराव मंजूर करण्यात आला.
आगामी निवडणुकीत भाजपने जे लक्ष्य निश्चित केले आहे ते कसे साध्य केले जाईल याचे समीकरण तावडे यांनी मांडले.मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी, महाविकास आघाडी सरकारने फडणवीस यांना तुरुंगात डांबण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सर्वोच्च पातळीवरून जबाबदारी दिली गेल्याचा आरोप केला. महाविकास आघाडी सरकारचे सुडाचे राजकारण किती भयानक होते, हे स्पष्ट होते, असे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणाऱ्या सूडपर्वाचा कार्यकारिणीने निषेध केला. गेल्या सात महिन्यांत घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करीत महाराष्ट्रालापुन्हा प्रगतिपथावर आणल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन करण्याचा ठराव करण्यात आला.
समीकरण काय?
२०१४ मध्ये भाजपला २८ टक्के मिळाली होती. तेव्हा शिवसेनेला १९ टक्के, काँग्रेसला १८ तर, राष्ट्रवादीला १७ टक्के मते मिळाली होती. शिवसेनेने हिंदूत्वाच्या विचाराशी तडजोड करीत काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. त्यामुळे हिंदू मते भाजपकडे वळवून २८ टक्क्यांवरून ती ४५ ते ५० टक्के करणे यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले.