जळगाव : अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारपासून राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून धरणगाव तालुक्यात ते सायंकाळी पाचच्या सुमारास पोहचले असता धरणगाव शहरात ठाकरे गटातर्फे सत्तार यांच्या मोटारींच्या ताफ्यावर कापूस फेकत निषेध करण्यात आला. यावेळी पन्नास खोके, एकदम ओके, सरकार हमसे डरती है… पुलिस को आगे करती है, या सरकारचे करायचे काय… खाली डोके वरती पाय, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा… सुवर्णनगरी जळगावात २० कोटींपेक्षा अधिक उलाढाल
कृषिमंत्री सत्तार हे जळगाव जिल्ह्यात गारपीटग्रस्त शेतांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांच्यासमवेत शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील हे होते. नुकसानीची पाहणी करून धरणगावहून जात असताना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कापसाने भरलेले खोके त्यांच्या मोटारींच्या ताफ्यासमोर फेकून निषेध केला. जोरदार घोषणाबाजी करून मंत्री सत्तार आणि राज्य सरकारचा ठाकरे गटाने निषेध केला. यावेळी ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा उपप्रमुख ॲड. शरद माळी, शहरप्रमुख भागवत चौधरी, युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा धरणगावचे माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, जिल्हा उपप्रमुख योगेश वाघ आदींनी सत्तार यांच्या मोटारींचा ताफा कापूस फेकत अडविण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख वाघ यांनी कापसाला १० ते १२ हजार रुपये भाव मिळावा यासाठी आम्ही सत्तार यांना भेटून मागणी करणार होतो. मात्र, ते न थांबताच निघून गेल्याचे सांगितले. १५ दिवसांपासून खानदेशासह जळगाव जिल्ह्यात गारपीट, पाऊस, वादळी वार्याने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. पिकांचे पंचनामे होऊनही अजूनही शेतकर्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत मिळायला हवी. सध्या कापसाला प्रतिक्विंटल सात ते साडेसात हजारांचा भाव आहे. त्यामुळे आम्ही कापूस दाखवून मंत्री सत्तार यांचा निषेध केला आहे. शेतकर्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो असे वाघ यांनी नमूद केले.