जळगाव – धरणगावसह परिसरात यंदा पावसाअभावी दुष्काळाच्या तीव्र झळा शेतकर्यांना बसत आहेत. त्यामुळे धरणगाव तालुक्यातील पाटाला तीन आवर्तन द्यावे, त्यातील पहिले आवर्तन नोव्हेंबरमध्ये सोडावे; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ यांनी धरणगाव तहसीलदार आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांना दिला आहे.
हेही वाचा >>> जळगाव जिल्ह्यातून दोन सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार
धरणगाव येथे ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख वाघ, युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांच्या नेतृत्वात नोव्हेंबरमध्ये शेतकर्यांना रब्बी हंगाम घेण्यासाठी पाटाला पाणी सोडावे, या मागणीचे निवेदन पाटबंधारे उपविभागाचे सहायक अधिकारी विजय जाधव, तहसीलदार सूर्यवंशी यांना देण्यात आले. वाघ आणि चौधरी यांनी अधिकार्यांशी चर्चेत शेतकर्यांच्या व्यथा मांडल्या. पदाधिकार्यांसह शेतकर्यांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या.
हेही वाचा >>> नाशिक : प्रतिबंधित प्लास्टिक प्रकरणी १४ जणांवर कारवाई
धरणगाव तालुका कापूस आगर समजला जातो. त्याखालोखाल गव्हाचा पेरा असतो. यावर्षी पाऊस होईल या आशेवर काहींनी कोरडवाहू कपाशीसह ज्वारी, मका लागवड केली होती. काहींनी कांद्याची लागवड केली. ऑक्टोबरमधील उष्णता आणि वातावरणातील बदल यांमुळे कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पीक वाया जाण्याच्या मार्गावर आहे. कपाशी, ज्वारी व मका लागवडीसाठी २० ते २२ हजारांचा खर्च झाला आहे. प्रत्येक गावात टंचाई निर्माण झाली असल्याने शासनाने त्वरित पिण्याच्या पाण्याची सोय तसेच जनावरांसाठी छावण्या उभाराव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी तालुकाप्रमुख जयदीप पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती दीपक सोनवणे, जिल्हा उपसंघटक राजेंद्र ठाकरे आदी उपस्थित होते.