लोकसत्ता वार्ताहर
धुळे: जुन्या सेवानिवृत्ती वेतन योजनेसाठी सुरु असलेल्या संपाच्या सातव्या दिवशी येथील कल्याण भवनाजवळ राज्य सरकारी कर्मचारी संघटनेसह हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जिल्हा परिचारीका संघटनेच्यावतीने सोमवारी पिपाणी, भोंगा वाजवून थाळीनाद आंदोलन करण्यात आले. सरकारला जाग आणण्यासाठी हे सर्वकाही केले जात असल्याचे संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संजय पाटील यांनी सांगितले.
या आंदोलनात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, दीपक पाटील, राजेंद्र माळी, वर्षा पाटील, प्रतिभा घोडके, नलिनी बाविस्कर आदींसह मोठ्या संख्येने कर्मचारी सहभागी झाले होते. सात दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचार्यांचे राज्यभर आंदोलन सुरु आहे. सात दिवस उलटूनही सरकारने मागण्या मान्य केलेल्या नाहीत. राजस्थान, हिमाचल प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, पंजाब सरकारने जुनी सेवानिवृत्ती योजना लागू केली असताना महाराष्ट्रातील सरकार योजना का लागू करत नाही, असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला आहे.
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि जाग आणण्यासाठी कल्याण भवनजवळ आणि जेलरोडवरील क्युमाईन रस्त्यावर पिपाणी, भोंगा वाजविण्यात आला. थाळीनाद आंदोलन करण्यात आले. घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली. २३ मार्च रोजी सर्व कर्मचारी काळे कपडे घालून शासनाचा निषेध करणार आहेत. २४ रोजी कुटुंबासह महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेने दिली.