लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : ग्लॅक्सोस्मिथक्लाईन फार्मास्युटिकल्स (जीएसके) आणि सेव्ह द चिल्ड्रन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हेल्दी स्कूल एन्व्हायर्नमेंट- राइट ऑफ एव्हरी चाइल्ड’ हा प्रकल्प राबविण्यात आला. नाशिकची पूनम निकम ही बालिका याच प्रकल्पाची एक यशस्वी विद्यार्थिनी असून नेदरलँड्सस्थित बाल हक्क संघटनेद्वारे देण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय बाल शांती पारितोषिक २०२० करिता तिचे नामांकन जाहीर झाले आहे.
पूनमसमवेत ४२ देशांमधील १४२ बालकांना हे नामांकन जाहीर झाले असून विजेत्यांची नावे १३ नोव्हेंबर रोजी घोषित करण्यात येतील. स्वच्छ भारत: स्वच्छ विद्यालय या सरकारच्या राष्ट्रीय अभियानाला पाठिंबा दर्शविताना नाशिक महानगरपालिकेच्या २० शाळांमध्ये ‘हेल्दी स्कूल एन्व्हायर्नमेंट- राइट ऑफ एव्हरी चाइल्ड’ उपक्र म राबविण्याच्या दृष्टीने महानगरपालिका, ग्लॅक्सोस्मिथक्लाईन फार्मास्युटिकल्स (जीएसके) आणि सेव्ह द चिल्ड्रन एकत्र आले. या प्रकल्पामार्फत अंदाजे १० हजार बालके, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता चांगली स्वच्छता, पिण्यायोग्य पाण्यासाठी बालकस्नेही सुविधा उभारण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी सवयींवर देखरेख ठेवणे आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी ६०० स्वच्छता दूत प्रशिक्षित करण्यात आले आहेत. पूनमला नामांकन जाहीर झाल्याबद्दल ग्लॅक्सोस्मिथक्लाईन फार्मास्युटिकल्स लिमिटेड, इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर व्यंकटेश यांनी पूनमचे अभिनंदन के ले आहे. पूनम ही स्वच्छता राखण्याकरिता झपाटलेली आहे. मुले कशा रीतीने समाजात बदल रुजविण्यात यशस्वी होतात याचे पूनम हे बोलके उदाहरण म्हटले पाहिजे. तिच्यामुळे या प्रकल्पाचा हेतू सार्थ ठरला. पूनमसारखे स्वच्छता दूत हे आमचे बालवीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पूनम ही पाथर्डी येथील एन.एम.सी. हायस्कूलची विद्यार्थिनी आहे. अनेक मंचांवर तिने महिलांच्या मासिक पाळीत आवश्यक असलेल्या स्वच्छतेविषयी विचार मांडले आहेत. प्रामुख्याने करोनाच्या पाश्र्वभूमीवर स्वच्छतेचे महत्त्व अनेकांना समजावून सांगितले. आरोग्य आणि स्वच्छताविषयक सत्रांशी निगडित ११० हून अधिक सत्रांमध्ये पूनमने सहभाग घेतला आहे. पूनम ही एक कुशल वक्ता आहे. तिला २०१९ मध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले होते. शाळेत असलेल्या चिल्ड्रन कॅबिनेट ग्रुपची (सीसीजी) ती सध्या मिनिस्टर ऑफ सॅनिटेशन आहे. तिने तिच्या समूहाच्या सहकाऱ्यांसोबत शाळेतील स्वच्छतागृहांची दुरवस्था मुख्याध्यापकांसमोर मांडली. हे स्वच्छतागृह स्वच्छ आणि चालू राहावे या दृष्टीने शालेय व्यवस्थापन समिती (एसएमसी)ने कठोर पावले उचलली. पूनम स्वत:च्या शाळेत बाल प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. नवयुवकांमध्ये होणारे शारीरिक बदल आणि तारुण्यात पदार्पण या विषयाचे प्रशिक्षण पूनमने पूर्ण केले आहे.
मासिक धर्मात वापरता येणारे पॅड्स अल्प किमतीत उपलब्ध असतात. ते वापरण्यास सुरक्षित आहेत, हे सांगून पूनमने अनेक मुलींना प्रेरित केले आहे. मासिक पाळीत केवळ मुलींनी नव्हे, तर सर्वानी स्वच्छतेचे व्यवस्थापन समजून घेतले पाहिजे यावर पूनमचा भर असतो. पूनमने ‘सेव्ह द चिल्ड्रन’ आणि ‘सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड अॅक्टिव्हिटी’ (सीवायडीए) द्वारे आयोजित सत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.