शाळेच्या प्रांगणात टवाळखोराने छेड काढून धमकाविल्याने भयभीत झालेल्या विद्यार्थिनीने वर्गात जाण्याऐवजी समाज मंदिरात आश्रय घेतल्याचे उघड झाले आहे. मुलीच्या पालकांनी समजाविण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने त्यांनाही शिवीगाळ करीत धमकावले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- मायलेकीवर हल्ला करुन संशयिताचा आत्महत्येचा प्रयत्न

शिवा उर्फ शुभम ताकतोडे (उपेंद्रनगर, सिडको) असे संशयिताचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे वाहनाने शाळेत गेली होती. वाहनातून उतरून ती मैदानातून वर्गात जात असताना संशयिताने तिला गाठले. आपण फिरायला जाऊ असे सांगत छेड काढली. यावेळी संशयिताने तू आली नाही तर बघतो, अशी धमकी दिल्यामुळे घाबरलेल्या मुलीने पळ काढला. वर्गात न जाता ती जवळच्या समाज मंदिरात जाऊन बसली. शाळा सुटल्यानंतर शालेय वाहनातून ती घरी परतली. धास्तावलेल्या मुलीने कुटुंबियांसमोर आपबिती कथन केली. संशयिताने याआधी वारंवार पाठलाग करून त्रास दिल्याचे तिने सांगितले. याच दरम्यान शालेय शिक्षिकेने मुलीच्या गैरहजरीबाबत पालकांशी संपर्क साधला. पालकांनी शाळेत त्यांची भेट घेतली.

हेही वाचा- जळगाव : सिहोरहून परतताना अपघातात पातोंड्याच्या दोन महिलांचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी

संशयित शुभम हा शाळेच्या आवारात नेहमी टवाळक्या करत असल्याचे उघड झाले. पालकांनी त्याचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळवत समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयिताने शिवीगाळ करीत धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, शहरातील अनेक शाळांच्या प्रवेशव्दारावर आणि आवारात टवाळखोरांचा उपद्रव वाढला आहे. अल्पवयीन मुलींना धमकावण्यापर्यंत त्यांची मजल गेली. टवाळखोराच्या दहशतीमुळे विद्यार्थिनी वर्गात जाऊ शकली नाही. महिला-मुलींच्या सुरक्षेसाठी कार्यरत निर्भया पथक नेमके काय करीत आहे, शालेय परिसरातील टवाळखोरांवर कारवाई कधी होणार, असे प्रश्न पालकांकडून उपस्थित केले जात आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The accused molested the school girl in the school premises in nashik dpj
Show comments