ओझर विमानतळावरील विमान सेवा धावपट्टीच्या देखभाल, दुरुस्तीमुळे १४ दिवस बंद राहणार असल्याने स्थानिक आणि परराज्यातून ये-जा करणाऱ्या प्रवाश्यांना मुंबई अथवा शिर्डी विमानतळाकडे धाव घेणे क्रमप्राप्त ठरले आहे. नाशिकहून दिल्ली, हैद्राबाद या दोन शहरांसाठी विमान सेवा कार्यान्वित आहे. धावपट्टी दुरुस्तीचे काम तीन डिसेंबरपर्यंत चालणार आहे. तोपर्यंत या दोन्ही शहरांना जोडणारी विमान सेवा बंद राहणार असल्याने प्रवाश्यांना अन्य पर्याय धुंडाळावे लागत आहेत.

हेही वाचा >>>नाशिक: महिला भाविकांना चोरांचा गंडा

हिंदुस्थान एरोनाॅटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) ओझर विमानतळावरून स्पाईस जेट कंपनीद्वारे नाशिक ते नवी दिल्ली आणि नाशिक ते हैद्राबाद या दोन ठिकाणी विमानसेवा दिली जाते. परंतु, धावपट्टी दुरूस्ती आणि देखभालसाठी २० नोव्हेंबर ते तीन डिसेंबर या कालावधीत ही विमानसेवा बंद राहणार आहे. हवाई वाहतूक संचालनालयाच्या सुचनेनुसार धावपट्टीची देखभाल, दुरूस्ती आणि मजबूतीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे कुठलेही विमान धावपट्टीवर उतरू किंवा उड्डाण घेऊ शकणार नाही. या पार्श्वभूमीवर, स्पाईस जेट कंपनीने विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नाशिक-दिल्ली आणि नाशिक-हैद्राबाद या दोन्ही हवाई सेवांना प्रवाश्यांचा चांगला प्रतिसाद आहे. हैद्राबादहून त्र्यंबकेश्वर, शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. विमानसेवा बंद झाल्यामुळे प्रवाश्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. १४ दिवसांच्या कालावधीत जवळपास ५० विमान फेऱ्या बंद राहतील. त्यामुळे प्रवाश्यांना एकतर मुंबई वा शिर्डी विमानतळ गाठणे हे दोन पर्याय राहिल्याचे आयमाच्या एव्हिएशन समितीचे अध्यक्ष मनिष रावत यांनी सांगितले. चार डिसेंबरपासून ओझरची धावपट्टी नियमित वाहतूक सेवेसाठी कार्यरत होईल. तोपर्यंत प्रवाश्यांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.

Story img Loader