लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: शाळेच्या इमारतीत अदलाबदल करताना प्रारंभी सांगितलेल्या नव्या इमारतीऐवजी भलत्याच जुन्या इमारतीत स्थलांतरीत केल्याची तक्रार करीत संतप्त पालकांनी मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात ठिय्या देत गतवर्षी शाळेची जी इमारत होती, ती पुन्हा उपलब्ध करण्याची मागणी केली. संस्थेने शालेय इमारत बदलताना पालकांना विश्वासात घेतले नाही. जी इमारत दिली गेली, तिथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावर तोडगा काढण्यासाठी संस्था कार्यालयात बैठक झाली. पालकांशी चर्चा करून सकारात्मकपणे विषय सोडविला जाणार असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
शिशूविहार आणि बालक मंदिर इंग्रजी माध्यमाच्या शाळेशी संबंधित हा विषय आहे. गुरूवारी शाळा सुरू होत असल्याने शेकडो पालक भोसलाच्या प्रांगणात जमा झाले. तिढा सोडविण्यासाठी मुख्याध्यापक आणि पदाधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळाला नसल्याची तक्रार पालकांनी केली. मध्यंतरी इंग्रजी माध्यमाची शाळा नव्या इमारतीत स्थलांतरीत होईल, असे सांगितले गेले होते. त्यास पालक राजी होते.
हेही वाचा… जळगाव: अखेर ती २९ मुले १४ दिवसांनंतर बिहार कडे रवाना,भुसावळहून भागलपूर एक्स्प्रेसने प्रवास
मात्र त्या नव्या इमारतीत शाळा स्थलांतरीत करण्याऐवजी ती दुसऱ्याच जुन्या इमारतीत स्थलांतरीत करण्यात आल्याची पालकांची तक्रार आहे. यापूर्वी ज्या इमारतीत आमच्या पाल्यांची शाळा होती, ती संस्थेने दुसऱ्या शाळेसाठी देऊन टाकली. ज्या जुन्या इमारतीत आमच्या पाल्यांची शाळा भरणार आहे, तिची अवस्था फारशी चांगली नाही. त्यामुळे नवी इमारत मिळाली नाही तरी पूर्वी ज्या इमारतीत शाळा होती, तीच इमारत कायम ठेवण्याचा आग्रह पालकांनी धरला. या संदर्भात चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षारक्षकांना बोलावून दबाव टाकला गेला, संस्था कार्यालयाकडे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला, महिला सुरक्षारक्षकांना पाचारण करण्यात आले, अशा तक्रारी पालकांनी केल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शाळेत धाव घेतली. परवानगी न घेता पालक असे एकत्रित जमू शकत नाही. जमावबंदीचे उल्लंघन केल्यावरून कारवाई होऊ शकते, असा इशारा पोलिसांनी दिल्याचे पालकांनी म्हटले आहे. अखेर निश्चित झाल्यानुसार सायंकाळी उशिरा संस्था पदाधिकारी आणि पालक संघाचे प्रतिनिधी यांच्यात बैठक सुरू झाली.
विद्यार्थ्यांच्या हितास प्राधान्य
संस्थेच्या इंग्रजी माध्यमांचे इयत्ता पहिली ते दहावीपर्यतचे वर्ग नव्या शैक्षणिक धोरणानुसार एकाच कॅम्पसमध्ये शेजारी, शेजारी असणाऱ्या इमारतीत भरविण्याची रचना केली होती. त्यानुसार इयत्ता पहिली ते चौथी आणि पाचवी ते दहावीचे वर्ग हे शेजारी असणाऱ्या इमारतीत भरविण्याचे प्रस्तावित नियोजन केले. अंतर्गत रचना व या बदलानुसार सध्या कामही सुरु केलेले होते. पुढील आठ ते दहा दिवसात हे संपूर्ण काम पूर्ण होणार आहे. पण याप्रश्नी पालकांमध्ये चूकीची माहिती देऊन गैरसमज निर्माण केला जात असल्याचे लक्षात आले आहे. हा प्रश्न लक्षात घेऊन संस्था पदाधिकाऱ्यांनी निवडक आठ ते दहा पालकांशी चर्चा केली. बैठकीत पुढील दहा दिवसांत सर्व काम पूर्ण करण्यात यावे, असे ठरले. संस्थेने नेहमीच विद्यार्थी विकास, हित आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. याबाबत संस्था कधीही मागे पाहिलेली नाही. पालकांच्या गैरसमजूतीतून हा प्रश्न पुढे आला होता, शेवटी संस्था ही विद्यार्थी-पालकांचीच आहेत, याबद्दल कुणाच्या मनात शंका असता कामा नये असे वाटते. – मिलींद वैद्य (कार्यवाह, मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण सोसायटी, नाशिक विभाग)