नाशिक – दीपावलीच्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आठ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत नियमित बस भाड्यात १० टक्के वाढ करण्यात आली आहे. नाशिक-पुणे शिवशाहीचा प्रवास ५० रुपयांनी तर, मुंबईचा प्रवास ४५ रुपयांनी महागला असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी दिली.
बहुसंख्य शाळा, महाविद्यालयांना दिवाळीची सुट्टी सुरु झाली आहे. गुरूवारपासून दीपोत्सवाला प्रारंभ होत असून यानिमित्त आपआपल्या गावी जाण्यास अनेक जण प्राधान्य देतात. शहरातून गावी जाणाऱ्यांच्या संख्येत त्यामुळे या दिवसात वाढ होते. प्रवाशांची होणारी गर्दी पाहता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास राज्य परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिल्यानुसार यात्रा, सणासुदीचा काळ, सुट्ट्यांच्या अनुषंगाने आठ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत परिवर्तनशील भाडेवाढ करण्यात आली आहे. ही वाढ १० टक्के आहे. मुंबईला जाणाऱ्या सर्वसाधारण, जलद बससेवेत कोणतीही भाडेवाढ नसून शिवशाहीला ४५ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. सध्या नाशिकहून मुंबईसाठी शिवशाहीचे भाडे ४०० रुपये आहे. शिवाईसाठी भाडेवाढ लागू नाही. पुणे साधारण बसचा प्रवास ३० रुपयांनी महागला असून नव्या भाडेदरात ३४५, शिवशाहीसाठी ५० रुपये भाडेवाढ असून नव्या दरात ५१५ रुपये आकारण्यात येणार आहे. शिवाईसाठी ५० रुपये अधिक द्यावे लागणार असल्याने तिकीट ५१५ रुपयांपर्यंत गेले आहे.
हेही वाचा >>>नाशिक महानगरपालिका, मऔविमला बाजू मांडण्याचे निर्देश; जायकवाडीला पाणी सोडण्याविरोधात याचिका
औरंगाबाद ते नाशिक साध्या बसचे भाडे ३० रुपयांनी वाढले असून नवीन भाडे ३२५ रुपये असेल. शिवशाहीसाठी ४५ रुपये वाढले असून ४८५ रुपये असे सुधारीत भाडे आहे. बोरिवलीसाठी शिवशाहीचा प्रवास ५५ रुपयांनी महागला आहे. बोरिवलीसाठी आता ४४५ रुपये द्यावे लागतील. धुळ्यासाठी सर्वसाधारण बसचे दर २५ रुपयांनी वाढले असून रुपये २६० इतके भाडे झाले आहे. महामंडळाच्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, बोरिवली, धुळे या मार्गांवर सातत्याने बस धावत असल्याने या दरवाढीमुळे महामंडळाच्या महसुलात वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रवासी भाड्यात आरक्षण शुल्काचा आणि अतिरिक्त भार शुल्काचा समावेश केलेला नाही. नाशिक-पुणे शिवशाही सेवा, शिवनेरी, शिवाई सेवा तसेच नाशिक-धुळे या विनावाहक सेवेसाठी ठोक भाडे आकरण्यात येणार आहे, असे विभाग नियंत्रक सिया यांनी सांगितले.