नाशिक – विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जावून विकासाच्या विविध शासकीय योजनांचा जागर करणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेच्या शुभारंभप्रसंगी डाॅ. पवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पालकमंत्री दादा भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी जितिन रहेमान आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. पवार यांनी कृषी, आरोग्य, महसूल यांसह इतर विभागांच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवा यांच्यासाठी असणाऱ्या योजना गावागावात पोहचविण्यासाठी विकास यात्रारथ गावोगावी फिरणार आहे, असे सांगितले. या विकास रथाच्या माध्यमातून गावागावांतील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळणार असून वेगवेगळ्या योजनांच्या लाभासाठीचे अर्जही भरून घेतले जाणार आहेत. लाभार्थ्यांच्या केवायसी संदर्भातील तसेच योजनांच्या बाबतीतील अडचणी व शंका यांचे निरसनही जागेवर केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.‘विकसित भारत संकल्प यात्रा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व यंत्रणांनी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन पालकमंत्री भुसे यांनी केले. २६ जानेवारीपर्यंत ‘हमारा संकल्प, हमारा भारत’ हा कार्यक्रम देशभरात राबवला जाणार आहे.
हेही वाचा >>>ठाकरेंच्या नाशिकमधील शिलेदाराला अटक, संजय राऊतांचा भाजपा, दादा भुसे अन् सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…
आदिवासी बांधवांसाठी असलेल्या वेगवेगळ्या योजनांविषयी जनजागृती व्हावी, या योजना लोकांपर्यत पोहचाव्यात, हाच या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी राज्यात निवडलेल्या जिल्ह्यात नाशिकचा समावेश केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पालकमंत्री भुसे यांनी आभार मानले. ग्रामपातळीवरील विविध विभाग आपल्या वेगवेगळ्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यात नक्कीच यशस्वी होतील, असा विश्वास व्यक्त भुसे यांनी व्यक्त केला. झिरवाळ यांनी, भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून होणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ आदिवासी बांधवांनी घ्यावा तसेच इतरांपर्यंतही योजनांची माहिती पोहचवावी, असे आवाहन केले.
हेही वाचा >>>बोली भाषा नाहीशा झाल्यास संस्कृतीला धोका;नंदुरबारमध्ये आदिवासी सांस्कृ़तिक महोत्सवात राज्यपाल रमेश बैस
कार्यक्रमापूर्वी आदिवासी बांधवांनी लोकनृत्य सादर केले. झिरवाळ आणि डॉ. पवार यांनीही नृत्यात सहभाग घेतला. प्रारंभी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी विकसित भारत संकल्पाची सामूहिक शपथ घेतली. कार्यक्रमानंतर विकसित भारत संकल्प यात्रा रथास हिरवा झेंडा दाखविण्यात आला. सूत्रसंचालन सचिन पवार यांनी केले. यावेळी विविध शासकीय योजनांच्या लाभाचे प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.