शिवसेनेतील ठाकरे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नवे नाव आणि धगधगती मशाल ही नवी निशाणी दिल्यानंतर मनमाड शहरातील शिवसैनिक धगधगती मशाल हाती घेऊन रस्त्यावर उतरले. गगनभेदी घोषणा देत आसमंत दणाणून सोडला.
शिवसेनेला मिळालेली नवी निशाणी आणि नवे नाव जनमानसात रूजविण्यासाठी शहर शिवसेना शाखा सरसावली आहे. शहराचा मुख्य मध्यवर्ती परिसर असलेल्या एकात्मता चौकात शिवसैनिकांनी शिवसेना विजयाच्या घोषणा देत मशाल हातात घेऊन फटाक्यांची आतषबाजी केली.
हेही वाचा >>> खासदार ज्येष्ठतेचा अडथळा दूर; डाॅ. भारती पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समिती गठीत
शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रविण नाईक, शहर प्रमुख माधव शेलार, शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष दिलीप सोळसे, शैलेश सोनवणे आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल हे नवे चिन्ह घराघरात आणि मनामनामध्ये पोहचविण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले असून यामुळे शिवसैनिकांना आणि शिवसेनेच्या विचाराला नवी उभारी मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया शहर प्रमुख माधव शेलार यांनी व्यक्त केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला.