लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: शहरातील गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेले सराईत गुन्हेगार आणि तशा स्वरुपाच्या गुन्ह्यात सामील होणाऱ्यांंची आता संपूर्ण कुंडली तयार करण्यात येणार आहे. गुन्हेगारांची नातेवाईकांच्या माहितीसह नावे, पत्ता, शिक्षण, व्यसन, उदरनिर्वाहाचे साधन, आर्थिक स्थिती आदी माहिती संकलित करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्याचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत. आतापर्यंत ४० टक्के गुन्हेगारांची माहिती संकलित झाली असून उर्वरित कामही लवकरच करण्यात येणार आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्थेला समाजकंटकांकडून आव्हान दिले जाते. अलीकडेच सिडको पाठोपाठ विहितगाव व नाशिकरोडमध्ये मद्यधुंद संशयित आणि सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली. या तीनही प्रकरणांतील संशयितांना पोलिसांनी अवघ्या काही तासात ताब्यात घेतले. त्यांची वरात काढण्यात आली. धोंगडे मळ्यात वाहन तोडफोडीच्या प्रकरणातील संशयितांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. वेगवेगळ्या भागातील टवाळखोरांवर यंत्रणेची नजर आहे.
हेही वाचा… नियोजित वेळेआधीच ट्रेन गेली, प्रवाशांना झाला मनस्ताप, कुठे आणि कधी घडलं हे? वाचा…
सराईत गुन्हेगारांचा शोध आणि संबंधितांवर प्रतिबंधक कारवाईला वेग दिला गेला आहे. उपरोक्त घटनांच्या पार्श्वभूमीवर, शहर पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलण्यावर भर दिला आहे. गुन्हेगारीला पायबंद घालण्यासाठी सराईत गुन्हेगारांच्या कुटुंब व नातेवाईकांची सखोल माहिती संकलीत केली जात आहे. संबंधिताने गुन्हा केल्यावर त्याला अटक करण्यासाठी या माहितीचा उपयोग होईल, असे पोलीस आयुक्त शिंदे यांनी लोकसत्ताला सांगितले. माहिती संकलनाचे हे काम ४० टक्के झाले आहे. उर्वरित ६० टक्के काम युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेेत.
हेही वाचा… नाशिक: एक लाखाचा गुटखा जप्त; दुकानावर कारवाई
विशिष्ट पध्दतीने गुन्हेगाराचे कुटुंबिय आणि नातेवाईकांची माहिती संकलित केली जाते. त्यासंबंधीचे अर्ज प्रत्येक पोलीस ठाण्याकडून भरून घेतले जात आहेत. या माध्यमातून गुन्हेगाराची संपूर्ण कुंडली यंत्रणेकडे असेल. एखाद्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगाराचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यास त्याला अटक करताना या माहितीचा उपयोग होईल असा यंत्रणेचा विश्वास आहे.
इत्यंभूत माहितीचे संकलन
शहर पोलीस या माध्यमातून गुन्हेगाराच्या नातेवाईकांची इत्यंभूत माहिती जमा करीत आहेत. त्यात नातेवाईकाचे नाव, वय, भ्रमणध्वनी क्रमांक, पत्ता या प्राथमिक माहितीसह शिक्षण, उदरनिर्वाहाचे साधन, गुन्हेगाराशी असणारे नाते, गुन्हे दाखल असल्यास त्याची माहिती, प्रतिबंधात्मक कारवाई, व्यसन व सवयी, आर्थिक स्थिती आदी माहिती अर्जाद्वारे घेतली जात आहे.
चौकसभांद्वारे नागरिकांशी संवादावर भर
वेगवेगळ्या भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस आयुक्त शिंदे यांनी चौक सभा घेण्याची संकल्पना मांडली होती. त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्याकडून दरमहा चौकसभा घेतल्या जात आहेत. या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून मार्गदर्शन केले जाते. अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यात वाढता सहभाग लक्षात घेऊन पालकांनी मुलांकडे लक्ष देणे, मुलांकडून गुन्हा घडल्यास होणारे दुष्परिणाम, सोनसाखळी चोरीच्या घटनांबाबत महिलांनी घ्यावयाची दक्षता, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, समाजमाध्यमे वापरताताना घ्यावयाची दक्षता, ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठीची खबरदारी आदी विषयांवर माहिती दिली जाते. ऑगस्ट महिन्यात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत प्रत्येकी चार चौक सभांचे आयोजन करण्यात येणार आहे.