मालेगाव: दागिने मिळवण्यासाठी मारहाण आणि गळा आवळल्याने बागलाण तालुक्यातील श्रीपुरवडे येथील वृध्देचा मृत्यू झाल्याप्रकरणी आनंदा सोनवणे याला येथील न्यायालयाने जन्मठेप व ५० हजार दंडाची शिक्षा ठोठावली.
शेणुबाई म्हसदे असे वृध्देचे नाव आहे. २३ सप्टेंबर २०१७ रोजी आनंदा हा पाणी पिण्याच्या बहाण्याने शेणुबाईच्या घरात घुसला. परस्परांशी चांगली ओळख असल्याने शेणुबाईने त्यास पाण्याबरोबरच चहा दिला. तेव्हा स्वयंपाक खोलीत गेलेल्या शेणुबाईच्या पाठीमागून गेलेल्या आनंदाने दोरीने गळा आवळून त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिने घेऊन तो पसार झाला होता. गंभीर जखमी झालेल्या शेणुबाईचा रुग्णालयात मृत्यू झाला होता.
या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आनंदास अटक केली होती. या खटल्याची सुनावणी येथील अप्पर व जिल्हा सत्र न्यायमूर्ती एस.यू.बघेले यांच्या न्यायालयात पार पडली. ॲड.एम. एस. फुलपगारे व ॲड. संजय सोनवणे यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला. गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायमूर्ती बघेले यांनी आनंदा यास जन्मठेप व ५० हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास दोन वर्षे कारावास भोगावा लागेल,असा आदेशही न्यायालयाने दिला. तसेच दंडाची वसुल होणारी रक्कम मयत वृध्देच्या पतीस देण्यात यावी, असे निकालात नमूद करण्यात आले आहे.