नाशिक – शहरात गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई होत नसल्याने हिंमत वाढलेल्या गुन्हेगारांनी आता थेट पोलिसांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पंचवटीत गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला. जखमी असतानाही पोलीस अधिकाऱ्याने पाठलाग करुन गुन्हेगाराला ताब्यात घेतले. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुन्हे शाखेत कार्यरत सहायक उपनिरीक्षक नामदेव सोनवणे हे शुक्रवारी सायंकाळी काम संपवून घराकडे निघाले होते. पंचवटीत त्यांना नोंदीतील गुन्हेगार गट्ट्या उर्फ विकी जाधव हा चाकू घेऊन दहशत निर्माण करताना दिसला. सोनवणे यांनी तातडीने आपले वाहन थांबवून विकीला पकडण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत विकीने सोनवणे यांच्यावर आपल्याकडील चाकूने हल्ला करुन तो पळाला. हल्ल्यात सोनवणे यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. रक्तस्त्राव सुरू असतानाही सोनवणे यांनी पाठलाग करुन विकीला पकडून पंचवटी पोलिसांच्या ताब्यात दिले. सोनवणेंनी दाखवलेल्या हिंमतीबद्दल नागरिकांसह पोलीस दलातून त्यांचे अभिनंदन होत आहे. विकी यास न्यायालयात हजर करण्यात आले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.