धुळे – साक्री तालुक्यातील चिखलीपाडा येथील चमकणारी मेणबत्ती (स्पार्कल कॅण्डल) तयार करण्याच्या कारखान्यातील आग आणि चार महिलांच्या मृत्यूप्रकरणी जैताणे गावात बुधवारी स्थानिक व्यापार्यांनी कडकडीत बंद पाळला. या घटनेतील आणखी एका जखमी महिलेचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा पाच झाला आहे. या प्रकरणी भवानी सेलिब्रेशन कंपनीचे मालक असलेल्या एका महिलेसह चार जणांविरुध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून तिघांना अटक झाली आहे.
निजामपूर परिसरातील चिखलीपाडा या भागात चमकणारी मेणबत्ती बनविण्याचा कारखाना पाच वर्षापासून सुरु होता. मंगळवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास कारखान्यात शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आगीत चार महिलांचा होरपळून मृत्यू झाला. याच घटनेतील संगीता चव्हाण (३५, जैताणे, साक्री) या जखमी महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा पाच झाला आहे. निकिता महाजन ही युवतीही रुग्णालयात दाखल आहे. कारखान्यात अशा दुर्दैवी घटना घडल्यास सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचे उघड झाले. या प्रकरणी भय्या भागवत यांच्या तक्रारीवरुन भवानी सेलिब्रेशन कंपनीच्या मालक रोहिणी कुवर, सुयश माने (दोघे रा.धोत्री, तुळजापूर ,धाराशिव), पर्यवेक्षक जगन्नाथ कुवर, ऑपरेटर अरविंद जाधव यांच्या विरोधात निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील रोहिणी, जगन्नाथ आणि अरविंद यांना अटक झाली आहे.
हेही वाचा >>>नाशिक : महिला मेळाव्यासाठी ठाकरे गटातर्फे विभागवार बैठकांवर भर
मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखाची मदत जाहीर
मेणबत्ती कारखान्यातील आगीच्या दुर्घटनेविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मृत्यू झालेल्या महिलांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींवरील उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.