नाशिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदगाव येथील जाहीर सभेतील गर्दी ओसरू नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रवेशद्वार बंद करून महिलांसह उपस्थितांची कोंडी करण्यात आल्याचे उघड झाले. पुरुष भिंतीवरून उड्या मारून कसेबसे बाहेर पडले. परंतु, पाच ते सहा तास ताटकळलेल्या महिलांना प्रवेशद्वार बंद ठेवत जबरदस्तीने सभेत बसायला भाग पाडल्याचा आरोप होत आहे. या संदर्भातील चित्रफिती समाजमाध्यमात प्रसारित झाल्या आहेत.
नांदगाव मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांच्या प्रचारार्थ रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडली. सभेची नियोजित वेळ दुपारी दोनची होती. तेव्हापासून महिला या सभेसाठी आल्या होत्या. सभा सुरू होण्यास रात्रीचे आठ वाजले. पाच ते सहा तास ताटकळत राहावे लागल्याने अनेक जण वैतागले. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच काही वेळांत महिलांसह अनेकांनी काढता पाय घेण्यास सुरुवात केली. परंतु, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. कुणाला बाहेर पडू दिले जात नव्हते. महिलांनी बाहेर सोडण्याची विनंती केली. मुले घरी एकटेच असल्याचे सांगितले. परंतु, त्यांना सोडण्यात आले नाही. जबरदस्तीने सभेत बसायला भाग पाडून दडपशाही केल्याचा आरोप होत आहे. मुख्यमंत्र्यांचा ताफा बाहेर पडल्याशिवाय प्रवेशद्वार उघडता येणार नसल्याचे कारण दिले गेले. या संदर्भातील चित्रफिती नांदगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्या आहेत.
हेही वाचा >>>निवडणुकीतच जातीचा विचार का; नितीन गडकरी यांचा प्रश्न
कित्येक तास सभास्थळी बसलेल्या अनेकांचे पाण्यावाचून हाल झाल्याचे सांगितले जाते. प्रवेशद्वाराच्या बाहेरून काही व्यक्ती आतमध्ये पाण्याच्या बाटल्या देत असल्याचे चित्रफितीत दिसते. दरवाजा बंद असल्याने कोंडी झालेल्या पुरुषांनी बाजार समितीच्या भिंतीवरून उड्या मारुन घर गाठले. महिलांना ते अशक्य होते. बाहेर पडणाऱ्यांची मोठी गर्दी झाल्यामुळे अखेर मुख्य प्रवेशद्वारावरील लहानसा दरवाजा उघडला गेला. तिथून एकावेळी जेमतेम एक-दोन जणांना बाहेर पडता येईल, एवढीच जागा होती असे पहावयास मिळाले. दरम्यान, जाणीवपूर्वक या चित्रफिती प्रसारित करण्यात येत असल्याचा आरोप महायुतीकडून करण्यात आला. सभास्थळी बाहेर पडण्यासाठी वेगळा मार्ग असल्याचा दावा करण्यात आला.
नांदगावमध्ये तिरंगी लढत होत असून महायुतीत बंडखोरी झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे, राष्ट्रवादीचा (अजित पवार) राजीनामा दिलेले समीर भुजबळ आणि महाविकास आघाडीचे गणेश धात्रक यांच्यातील ही लढत विविध कारणांनी गाजत आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी उपस्थितांची झालेल्या कोंडीची भर पडल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे.