नाशिक – पावसाअभावी दुष्काळाचे संकट घोंघावत असताना पुढील काळात पिण्याच्या पाण्यासह जनावरांना पाण्याची टंचाई भेडसावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे अतिशय कमी पर्जंन्यमान झालेल्या नांदगाव तालुक्यातील माणिकपूंज आणि नागासाक्या या धरणांतील मृतसाठ्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने थेट या धरण परिसरातील वीजपुरवठा अनिश्चित काळासाठी खंडित ,करण्याचे निर्देश दिले आहेत.
अनेक तालुक्यांमध्ये या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या गर्तेत सापडला आहे. ऑगस्टअखेरपर्यंत जिल्ह्यात सर्वसाधारपणे ७४१ मिलीमीटर पाऊस होतो. या वर्षी हे प्रमाण केवळ ३९९.२ मिलीमीटर आहे. सरासरीच्या ५४ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. अनेक भागात पिके करपली असून पुढील काळात पाऊस झाला तरी त्यांना जीवदान मिळण्याची शक्यता मावळली आहे. सिन्नर तालुक्यातील ४१ गावात पेरणीच झालेली नाही. जिल्ह्यातील धरणांमध्ये ७७ टक्के जलसाठा असून शासकीय धोरणानुसार केवळ पिण्यासाठी तो प्राधान्याने राखीव असणार आहे. परतीच्या पावसाने साथ न दिल्यास सिंचनासाठी पाणी मिळणे धूसर होणार आहे. या एकंदर स्थितीत धरणांमध्ये उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.
हेही वाचा >>>मुख्यमंत्री नऊ सप्टेंबरला पाचोऱ्यात, शासन आपल्या दारी तालुका उपक्रम
नांदगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे या भागातील माणिकपूंज आणि नागासाक्या या धरणांमध्ये जलसाठा होऊ शकलेला नाही. त्यात केवळ मृतसाठा आहे. पाऊस कमी झाल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतकरी या धरणांमधून अनधिकृतपणे पाण्याचा उपसा करतात. पाऊस कमी असल्याने भविष्यात तालुक्यात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पुढील आदेश होईपर्यंत माणिकपुंज, नाग्यासाक्या, कासारी क्रमांक एक व दोन या धरण परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत.