लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: अग्निशमन सेवा सप्ताह निमित्त महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्यावतीने हिरावाडीतील गोकुळ धाम या बहुमजली इमारतीत आग विझविण्याची रंगीत तालीम झाली. यावेळी धुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली. आग प्रतिबंधक योजना कार्यान्वित करणे, आग विझविण्यासाठी उपलब्ध यंत्रणेचा वापर कसा करावा, एलपीजी गॅस सिलिंडर हाताळताना घ्यावयाची काळजी आदींबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
मनपाच्या अग्निशमन विभागामार्फत अग्निशमन सेवा सप्ताह निमित्त विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या अंतर्गत पंचवटीतील हिरावाडी भागात गोकुळ धाम इमारतीत आग विझविण्याकामी रंगीत तालीम करण्यात आली. ३२ मीटर उंच शिडीच्या सहाय्याने जवानांनी पाण्याची फवारणी केली. नंतर धुरात अडकलेल्या नागरिकांना या शिडीद्वारे बाहेर काढण्यात आले. इमारतीतील महिलांना अग्निनिर्वाणके हाताळून आग कशी विझवता येते, याबाबत जवानांनी माहिती दिली. एलपीजी गॅस सिलिंडर हाताळताना कशा प्रकारे काळजी घ्यावी, याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
हेही वाचा… नाशिकमधल्या चांदीच्या गणपतीचे दागिने लंपास, सुरक्षारक्षकाच्या डोक्यात लोखंडी रॉडचा फटका मारून चोरी
हेही वाचा… नाशिक जिल्ह्यात पुन्हा गारपीट, वादळी पाऊस; द्राक्षांसह शेतमालाच्या नुकसानीत भर
आग लागल्यास ती कशी आटोक्यात आणावी याबाबत माहिती देण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत इमारतीतील आग प्रतिबंधक उपाय योजना कशा प्रकारे कार्यान्वित करायची याबाबतही माहिती दिली. या रंगीत तालमीत गोकुळ धाम इमारतीमधील नागरिकांसह मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी, फायरमन संजय कानडे, प्रदीप बोरसे, बाळासाहेब लहागे, मंगेश पिंपळे, विजय नागपूरे, विजय चव्हाणके, वाहन चालक अशोक सरोदे, शांताराम गायधनी, मुस्ताक पाटकरी यांनी सहभाग घेतला होता. तसेच महाराष्ट्र फायर सर्व्हिस अकादमीचे १० जवानही सहभागी झाले होते.