नाशिक: भारतीय तोफखान्याच्या भात्यातील बोफोर्स, धनुषसह अन्य १५५ मिमी तोफांमधून डागलेले तोफगोळे क्षमतेपेक्षा १५ ते २० किलोमीटर अधिकवर मारा करू शकतील, असे तंत्रज्ञान आयआयटी मद्रासने विकसित केले आहे. नियमित तोफगोळ्याच्या खालील भागात ‘रॅमजेट’ कवच बसवून तोफांची मारक क्षमता ६० किलोमीटरपर्यंत नेण्याची तयारी केली जात आहे.
देवळालीस्थित तोफखाना स्कूलच्यावतीने मंगळवारी आयोजित ‘तोपची’ वार्षिक सोहळ्यात तोफखाना दलाच्या आधुनिकीकरणावर प्रकाशझोत टाकण्यात आला. नव्या स्वदेशी तंत्रज्ञानाने आगामी काळात तोफांच्या माऱ्याला अधिक भेदक स्वरुप प्राप्त होणार आहे. तोफांची मारक क्षमता उंचावण्यासाठी संशोधनाची जबाबदारी संरक्षण मंत्रालयाने आयआयटी मद्रासवर सोपवली होती. या संस्थेने रॅमजेट हे विशिष्ट प्रकारचे कवच तयार केले. जे तोफगोळ्याच्या मागील बाजूस लावले जाते. त्यामध्ये प्रणोदक (प्रोपेलंट) असतात. तोफगोळा डागताना मागील बाजूला उडणाऱ्या ठिणग्यांनी गरंम हवा आत जाऊन ते प्रज्वलित होतात. आणि अधिक शक्ती देऊन पल्ला वाढवितात. अशी त्याची कार्यपद्धती असल्याचे आयआयटी मद्रासच्या संशोधकांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
हेही वाचा ;‘तोपची’मधून तोफा, गनर्सचे कौशल्य अधोरेखीत-प्रदर्शनात प्रगत शस्त्रसामग्री सादर
तोफखाना स्कूलच्या फायरिंग रेंजवर त्याची यशस्वीपणे चाचणी झाली आहे. यात आणखी सुधारणा केल्या जात असून पुन्हा चाचण्या घेण्यात येणार आहेत. तोफगोळ्यात समाविष्ट करता येते. तोफांचा पल्ला उंचावणारे हे तंत्रज्ञान सध्या जगात कोणाकडेही नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. युद्धात संपूर्ण खेळ बदलणारे हे तंत्रज्ञान असल्याचे तज्ज्ञ सांगतात.