नाशिक: अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी आडगाव परिसरातील खंडेराव मंदिरासमोरील दुकानावर छापा टाकून एक लाखाहून अधिक किंमतीचा गुटखा जप्त केला.
आडगांव येथील महालक्ष्मी ट्रेडर्सचा मालक प्रशांत सावळकर या ठिकाणी उपस्थित होता. अधिकाऱ्यांनी दुकानाची झडती घेतली असता २६७५ रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा विक्रीसाठी आढळला. दुकानाच्या वाहनाची तपासणी केली असता ४५७८९ रुपयांचा प्रतिबंधित साठा आढळून आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी सावळकर यांच्या राहत्या घराचीही तपासणी केली. त्यात ५०४२८० रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा आढळून आला. असा एकूण १.५२.७४४ रुपयांचा प्रतिबंधित साठा तसेच सदरचे वाहन अन्न सुरक्षा अधिकारी गो. वि. कासार यांनी जप्त करून पोलिसाच्या ताब्यात दिले.
हेही वाचा… जळगाव: एरंडोल तालुक्यातील वसतिगृहात पाच मुलींवर अत्याचार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; दोघांना अटक
जप्त वाहनाची किंमत दोन लाख रुपये असून दुकानाचा पुन्हा गुटखा साठवणुकीसाठी वापर होऊ नये म्हणून दुकान गोठविण्यात आले आहे. या संदर्भात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा वाहतूक किंवा विक्री केल्यास प्रशासनास माहिती देण्यात यावी, त्यासाठी प्रशासनाच्या १८००२२२३६५ या टोलमुक्त क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.