निकृष्ट दर्जाच्या भोजनामुळे आरोग्य समस्या बळावल्याची तक्रार
भाजी पाण्यासारखी, तिच्यात मीठ नाही की तिखटाचा लवलेश नाही. यंत्रावर भाजलेल्या पोळ्या कच्च्या. यामुळे मळमळ, पोटदुखी तत्सम विकार बळावत असल्याची तक्रार करीत सोमवारी पेठ रस्त्यावरील एकलव्य शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी दुपारच्या भोजनावर बहिष्कार टाकून अन्नत्याग आंदोलन केले. आदिवासी विकास विभागाने याची दखल न घेतल्याने सायंकाळपर्यंत विद्यार्थ्यांना उपाशीच राहावे लागले.
आदिवासी विकास विभागाची पेठ रस्त्यावर एकलव्य शाळा आणि वसतिगृह आहे. या ठिकाणी एकूण ३५२ मुले-मुली शिक्षण घेऊन वास्तव्य करतात. आदिवासी विकास विभागाने काही वर्षांपूर्वी शाळेतील भोजन व्यवस्थेचे काम मध्यवर्ती किचन संस्थेकडे सोपविले. याद्वारे मिळणारे भोजन खाण्यायोग्य नसल्याची तक्रार विद्यार्थी वारंवार करतात. अनेकदा आंदोलनेही केली गेली, परंतु संबंधित विभाग कोणतीही दखल घेत नसल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. सोमवारी पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाली.
दुपारच्या भोजनावर बहिष्कार टाकत विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले. वारंवार तक्रार करूनही भोजनाचा दर्जा सुधारला नाही. भाजी केवळ पाण्यासारखी असते. तिखट, मीठ नसल्याने तिला कोणतीही चव नसते. पोळ्यांची कथा निराळी असल्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. यंत्रावर या पोळ्या भाजल्या जातात. त्या कच्च्या असतात. निकृष्ट दर्जाचे भोजन सेवन केल्याने अनेकांना पोटदुखी, मळमळ होत आहे. यंत्रावर पोळ्या न भाजता हाताने भाजलेल्या पोळ्या द्याव्यात, भाजीत मसाल्याचा वापर करावा, चांगले भोजन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने पुरवठादाराला बाध्य करावे, अशी मागणी करण्यात आली.
शाळेतील प्राचार्य, गृहपाल यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या. गृहपालांनी संबंधित अधिकारी, ठेकेदाराशी संपर्क साधल्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागेल, असे सांगितले. आंदोलक विद्यार्थ्यांशी सायंकाळपर्यंत जबाबदार अधिकाऱ्याने संवाद साधला नाही. आंदोलनाची दखल घेतली नाही. तोडगा काढला गेला नाही.