नाशिक : शहरात बांधकाम आणि पाडकामाद्वारे तयार होणाऱ्या राडारोड्यावर (सिमेंटयुक्त दगड, माती, विटांचा कचरा) प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने १५० मेट्रिक टन प्रतिदिन क्षमतेचा प्रकल्प सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या संयुक्त भागीदारी (पीपीपी) तत्वावर उभारला आहे. सध्या या प्रकल्पात यंत्र सामग्रीच्या चाचण्या सुरू असून मार्चपासून राडारोड्यावर प्रक्रिया होऊन या कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे.

शहरात घराघरातील कचरा दैनंदिन घंटागाडीद्वारे संकलित करून पाथर्डी शिवारातील खत प्रकल्पात त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यापासून सेंद्रिय खत व सुक्या कचऱ्यापासून आरडीएफ आणि काही प्रमाणात प्लास्टिकवर प्रक्रिया करून ‘ग्रॅन्युल्स’ आणि फर्नेस ऑईल तयार केले जाते. जुन्या घरांचे पाडकाम आणि बांधकामाधिन प्रकल्पातून निर्माण होणारा कचरा अर्थात राडारोड्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेकांकडून तो मोकळ्या जागा वा नदीकाठी अनधिकृतपणे टाकला जातो. गोदावरीच्या काठावर गंगापूर रोड परिसरात अनेक ठिकाणी असा राडारोडा दृष्टीपथास पडतो.

या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून शहरातील राडारोड्याच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले. १५० मेट्रिक टन क्षमतेचा हा प्रकल्प पीपीपी तत्वावर उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. सध्या यंत्रणेच्या चाचण्या अंतिम टप्प्यात असून फेब्रुवारीत प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. त्यानंतर शहरातील राडारोड्यावरील प्रक्रियेला सुरूवात होणार असल्याचे मनपा उपायुक्त अजित निकेत यांनी सांगितले.

सध्या ४० मेट्रिक टनचे संकलन

घंटागाडीद्वारे सध्या ४० मेट्रिक टन राडारोडा (सिमेंट, दगड, माती स्वरुपातील कचरा) संकलित होतो. कमी उंचीवरील क्षेत्रात वा खड्डे भरण्यासाठी त्याचा वापर केला जातो. एखाद्या भागात राडारोड्याची तक्रार आल्यास तो उचलून नेला जातो. आता हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर रितसर विहित शुल्क भरून कोणालाही हा कचरा मनपाच्या स्वाधीन करता येईल.

प्रक्रियेअंती दगड, वाळू, खडीचा पुनर्वापर शक्य

सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या या प्रकल्पात प्रतिदिन १५० मेट्रिक टन राडारोड्यावर प्रक्रिया करता येईल. प्रकल्पात आलेल्या कचऱ्याचा भूगा केला जाईल. नंतर प्लास्टिक, खडी, वाळू, मोठे दगड व माती वेगळे होईल. पाण्याने तो धुतला जाईल. विलगीकरणाची प्रक्रिया पार पडली की या साहित्याचा पुनर्वापर करता येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Story img Loader