नाशिक: ए, गई बोला ना… काय पो छो… अशा आरोळ्या..अवकाशात पतंगांची भरलेली जत्रा. वाद्यांचा दणदणाट, असा थाट येवला येथील पतंगोत्सवाचा राहिला. तीन दिवसांच्या पतंगोत्सवाचा सोमवारी रात्री आतषबाजीने समारोप झाला. पंतगोत्सव आणि रंगपंचमी हे येवल्याचे आकर्षण. अवकाशात पतंग भिरकावणे म्हणजे पतंगबाजी नव्हे तर, पतंग अवकाशात झेप घेतांना हवेच्या प्रत्येक झोक्याबरोबर आनंद लुटणे.
पारंपरिक हलगी वाद्यावर ताल धरत गच्चीवर उत्साह पसरलेला असतो. सोबतीला फाफडा, जिलेबी, वडापाव, मिठाई अशा वेगवेगळ्या खाद्य पदार्थांवर ताव मारला जातो. मुख्य म्हणजे हा पतंगोत्सव तीन दिवस चालतो. मकरसंक्रांतीच्या आधी आणि नंतर हा उत्सव सुरू राहतो. पतंगबाजी करणाऱ्यांचे गाव ही येवल्याची ओळख. यंदाही या उत्सवाची धुम कायम राहिली. येवल्याची पतंगची खासियत म्हणजे अतिशय कमी वाऱ्यात उडते. कारण पतंगीत वजनाने हलक्या काड्या वापरल्या जातात.
व्हिडिओ :
मोठ्या आकारातील वेगवेगळ्या प्रकारच्या पतंगी उडविण्याचे कौशल्य अनेकांकडून दाखवले जाते. यामध्ये पुरूषांचा सहभागा सोबत महिला, युवतींचा सहभाग लक्षणीय राहिला आहे. लंगुर, बालाजी, अजिंठा, प्रकाश, फाईन, अश्फाक, कोहिनूर, ए-वन अशा वेगवेगळ्या पसंती अवकाशात उंच उंच उडत राहिल्या. कधी मुलींच्या तर कधी माणसांच्या हातात. कामानिमित्त येवला सोडून गेलेले काही कुटूंबिय खास पतंगोत्सवासाठी येवल्यात दाखल झाले. सोमवारी सायंकाळी उशीरा आतशबाजीने पतंगोत्सवाचा समारोप झाला.
या विषयी येवल्याची मात्र सध्या कामानिमित्त मुंबईला असलेल्या प्राजक्ता नागपुरेने आपला अनुभव मांडला. पतंग उडविण्यात फक्त मुलेच नव्हे तर, मुलीही पुढे असतात. गई बोला, काय पो छे, ए लपेट या आरोळ्या ठोकण्यात वेगळीच मजा आहे. मुलांची टीम विरूध्द मुलींची टीम असा पेच आम्ही लढवतो. काही मुली तर मुलांपेक्षा सफाईदार सरस पतंग उडवतात. मुलीच नाही तर अगदी आजीबाईही पतंगबाजीत उत्साहात सहभागी होतात. येवल्याची डॉ. आदिती पटेलने मैत्रिणींसोबत पतंग उडविण्याचा आनंद घेतल्याचे सांगितले. त्याची सगळी तयारी आम्ही मिळून १५ दिवस आधी पासून करतो. पतंगबाजीची खरी गंमत कणी कापण्यात आणि पेच लढविण्यात असते. कोणाची पतंग कटली की उड्या मारण्याचा आनंद कधीच जुना होणार नाही. संक्रांतीच्या दिवशी सगळी कामे लवकर आवरत सकाळी गल्लीतल्या सगळ्या बायका गच्चीवर येऊन पतंग उडवतात. त्यावेळी त्यांच्यातली एकी कोणी तोडू शकत नसल्याचे आदितीने सांगितले.