नाशिक : स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीेने शहरात अशोक स्तंभ ते त्र्यंबक सिग्नल दरम्यानच्या रस्त्याची स्मार्ट बांधणी करताना सीबीएस सिग्नलवर डाव्या बाजूला बांधकाम करुन कायमस्वरूपी ती बाजू रहदारीसाठी बंद केली होती. याबाबत वाहनचालक, सामाजिक संस्थांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर चार वर्षांनी ही बाजू वाहनांसाठी मोकळी करण्याचे काम सुरु करण्यात आले.
शहराच्या मध्यवर्ती सीबीएस चौकात सिग्नल व्यवस्था आहे. या ठिकाणी वाहनांना डाव्या बाजूस जाण्यासाठी पूर्वी रस्ता मोकळा होता. परंतु, चार वर्षापूर्वी शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेतंर्गत या चौकात स्मार्ट सिटी विभागाने केलेल्या कामात वाहनांना डाव्या बाजूस वळण्यास पूर्वीप्रमाणे जागा सोडण्यात आली नव्हती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. वाहनचालकांना डाव्या बाजूला पूर्वी सहज वळण घेता येत होते. परंतु, स्मार्ट रस्त्याच्या कामामुळे सिग्नल सुटल्यानंतर पुढे जाऊन वळण घेणे भाग पडू लागले.
हेही वाचा >>> शिरपूर तालुक्यात इतर पिकांमध्ये गांजा शेती; एक कोटीपेक्षा अधिकचा माल जप्त
साहजिकच संपूर्ण वाहतूक ठप्प होते. वाहनांना डाव्या बाजूस जाण्यासाठी अडथळा निर्माण होत होता. बुधवारी डाव्या बाजूकडील रस्त्यावर असलेले पेव्हरब्लॉक काढून टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. यामुळे वाहतूक कोंडीचा, प्रदूषणाचा व वेळेचा खोळंबा थांबणार आहे. डावीकडील बाजू मोकळी झाल्यामुळे वाहतूक कोंडीही कमी होण्यास मदत होणार आहे. याविषयी पर्यावरणप्रेमी निशिकांत पगारे यांनी माहिती देताना दोन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर स्मार्ट सिटी विभागाने सीबीएस येथे केलेले बांधकाम काढून टाकण्यास सुरुवात केल्याचे सांगितले.