केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री-आमदार समोरासमोर

अनिकेत साठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक – आमदार निधीतून उभारलेली सामाजिक सभागृहे, विरंगुळा केंद्र, अभ्यासिका आणि तत्सम ठिकाणे महापालिकेकडून बळजबरीने ताब्यात घेऊन ती गोठविली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. शहरात १०५ आरोग्य वर्धिनी केंद्रांच्या उभारणीसाठी या वास्तू ताब्यात घेण्यात आल्या. मात्र, ही कारवाई करताना स्थानिक आमदार आणि संबंधित संस्थांनाही अंधारात ठेवल्याचा आक्षेप नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी नोंदविला. महानगरपालिकेने दीड वर्ष रखडलेल्या आरोग्य वर्धिनी केंद्रांसाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या सूचनेनुसार मनपाच्या अधिकारातील जागा ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. या घटनाक्रमाने भाजपच्या आमदार सीमा हिरे आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार समारोसमोर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शहरात एकूण १०६ आरोग्यवर्धिनी केंद्र (आपला दवाखाना) उभारण्यात येणार आहेत. त्यातील पहिले केंद्र चुंचाळे शिवारात कार्यान्वित झाले. उर्वरित १०५ केंद्रांसाठी मनपाच्या जागेतील सभागृह, विरंगुळा केंद्र, अभ्यासिका, व्यायामशाळा आदी वास्तुंकडे प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले. आरोग्यवर्धिनी केंद्राची रचना आरोग्य उपकेंद्रासारखी आहे. त्याकरिता किमान ५०० चौरस फूट जागा अपेक्षित आहे. या योजनेत केंद्राच्या उभारणीसाठी निधीची व्यवस्था नसल्याने प्रशासनाने अस्तित्वातील मनपाच्या इमारती व वास्तू शोधून १०५ आरोग्य वर्धिनी केंद्रांसाठी जागा निश्चित केल्या आहेत. या वास्तुंमध्ये काही दुरुस्ती व नुतनीकरणाची कामे करावी लागणार आहेत. त्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने बांधकामला पाठविला आहे. स्थानिकांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या प्रयोजनार्थ आमदार निधीतून उभारलेल्या आणि सध्या वापरात असलेल्या वास्तू मनपाने परस्पर ताब्यात घेण्याची कारवाई केली. त्या वास्तूची जबाबदारी सांभाळणाऱ्या संस्था व स्थानिक लोकप्रतिनिधींना पूर्वकल्पना न देता एकतर्फी ही कारवाई झाल्याचा आक्षेप घेतला जात आहे. या कारवाईमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांना त्यांची हक्काची जागा गमवावी लागली. सिडकोतील पाटीलनगर येथे ५० लाखांच्या फर्निचरने साकारलेली अभ्यासिकाही प्रशासनने आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी ताब्यात घेण्याची करामत केली. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत आ. सीमा हिरे यांनी हा विषय मांडून प्रशासनाला जाब विचारला होता. आमदारांना विश्वासात न घेता जागा निश्चित करण्यात आल्या. यामुळे स्थानिक आमदार व मनपा प्रशासनात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

हेही वाचा >>>जळगाव: पाचोर्‍यानजीक बस-मालमोटार अपघातात १५ विद्यार्थी जखमी

नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात इंदिरानगर, पाथर्डी फाटा, सिडकोतील पाटीलनगर अशा अनेक भागातील वास्तू मनपाने बळजबरीने परस्पर ताब्यात घेतल्या आहेत. पाटीलनगर येथील बहुमजली वास्तुत तीन सभागृह आहेत. एका सभागृहात ५० लाखांचे फर्निचर आणून नुकतीच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका करण्यात आली. एका सभागृहाचा महिला योगासनांसाठी वापर करीत होत्या. या वास्तुला प्रशासनाने टाळे ठोकले. स्थानिकांच्या मागणीनुसार आपण आमदार निधीतून आजपर्यंत मतदार संघात सुमारे १२० विरंगुळा केंद्र, सामाजिक सभागृह, व्यायामशाळा, अभ्यासिका आदींची उभारणी केली. प्रशासन कुठलीही कल्पना न देता वास्तू ताब्यात घेत आहे. – सीमा हिरे (आमदार)

हेही वाचा >>>नाशिक: पोलिसांकडून रात्रभर विशेष तपासणी मोहीम, चार फरार गुन्हेगार ताब्यात

शहरात १०६ आरोग्यवर्धिनी केंद्रांसाठी सुमारे १५ कोटींचा निधी उपलब्ध होऊन दीड वर्षात त्या अनुषंगाने कुठलीही प्रगती झाली नव्हती. आतापर्यंत केवळ एक केंद्र कार्यान्वित झाले आहे. याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अलीकडेच एका बैठकीत रोष व्यक्त केला. त्यांच्या सूचनेनुसार उर्वरित १०५ केंद्रांच्या उभारणीसाठी मनपाच्या अधिकारातील जागा शोधण्याचे काम हाती घेण्यात आले. या योजनेत पहिली अट अस्तित्वातील जागेचा वापर करण्याची आहे. त्यामुळे महानगरपालिककडे त्या वास्तू ताब्यात घेण्याशिवाय कुठलाही पर्याय नव्हता. प्रशासनाने मनपाच्या अखत्यारीतील, अधिकार असणाऱ्या वास्तुंचा शोध घेतला. काही जागा अनधिकृतपणे वापरात होत्या. त्याही ताब्यात घेण्यात आल्या. आरोग्यवर्धिनी केंद्रांची उभारणी नागरिकांच्या कल्याणासाठी आहे. जागा ताब्यात घेताना आक्षेप नोंदविले गेल्याने या प्रकल्पास विलंब झाला. – भाग्यश्री बाणायत (आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The location of 105 arogyavardhini kendras is in dispute mutually held by the vastu municipal corporation set up with mla funds amy
Show comments