यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद
दिवाळीनंतर गारव्याची अनुभूती घेणाऱ्या नाशिकची कडाक्याच्या थंडीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून आता हा परिसर धुक्याच्या दुलईत लपेटला गेल्याचे पहावयास मिळत आहे. नाशिकमध्ये बुधवारी हंगामातील नीचांकी म्हणजे १०.४ अंश तापमानाची नोंद झाली. गारठून टाकणाऱ्या थंडीने सर्वसामान्यांना चांगलीच हुडहुडी भरली असताना दिवसाही गारव्याचे अस्तित्व अधोरेखित होत आहे.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात डिसेंबरच्या सुरुवातीपासून वातावरणाचा नूर पालटत आहे. राज्यात सर्वात कमी तापमानची नोंद करणाऱ्या नाशिकप्रमाणेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्य़ातील तापमानही झपाटय़ाने कमी होत असल्याचे निदर्शनास येते. यंदाच्या कडक उन्हाळ्यानंतर पावसाचे आगमन काहीसे विलंबाने झाले. उशिरा आलेला पाऊस अखेरच्या सुमारास हवा तसा बरसला नाही. यामुळे यंदाची थंडी कशी असणार याबद्दल सर्वसामान्यांकडून आडाखे बांधले जाऊ लागले, परंतु डिसेंबर सुरू झाल्यापासून थंडीने आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली आणि गेल्या चार ते पाच दिवसांत तिने वातावरण गारठून टाकले आहे. मागील सात दिवसांत नाशिकचे तापमान ६.६ अंशाने कमी झाले आहे.
२ डिसेंबर रोजी १७ अंशावर असणारे तापमान बुधवारी १०.४ अंशावर आल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली. कडाक्याची थंडी दाखल झाल्याने सर्वाना हुडहुडी भरल्याचे चित्र आहे. नीचांकी तापमानाबरोबर बुधवारी नाशिक शहर व परिसर धुक्यांच्या दुलईत लपेटला गेल्याचे पाहावयास मिळाले.
वास्तविक, एरवीच्या तुलनेत जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या सुमारास नीचांकी पातळी गाठणारे तापमान यंदा डिसेंबरच्या सुरुवातीला त्या पातळीवर चालल्याचे दिसत आहे. प्रत्येक हंगामात उत्तर महाराष्ट्रात किमान दोन ते तीन वेळा थंडीची लाट येत असते. त्या वेळी सलग तीन ते चार दिवस ही लाट मुक्काम ठोकते असा अनुभव आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव हे तापमान कमी होण्यामागील कारण आहे.
मागील काही वर्षांतील थंडीचा आढावा घेतल्यास अपवाद वगळता जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात तापमानाने नीचांकी गाठल्याचे लक्षात येते. २००२ मध्ये २८ फेब्रुवारीच्या दिवशी नाशिकच्या तापमानाने ५ अंश या सर्वात कमी तापमानाची नोंद केली. त्या पुढील म्हणजे २००३ मध्ये तापमानाचा नूर जानेवारी महिन्यात पालटला होता. १ जानेवारी रोजी ५.४ अंश असे नीचांकी तापमान नोंदले गेले. त्यानंतर २००४ साली तापमान सर्वात कमी होण्यासाठी फेब्रुवारी महिना उजाडावा लागला. ६ फेब्रुवारी रोजी तापमान ८ अंशावर पोहचले. त्यापुढील २००५ मध्ये १९ जानेवारीला ६ अंश, तर २००६ साली २६ जानेवारीला ६.६ अंशाची नोंद झाली होती. २००७ मध्ये २२ नोव्हेंबर रोजी ७.२ तर २००९ मध्ये ३१ डिसेंबर रोजी ७.८ या तापमानाची नोंद झाली. आठ वर्षांत कमी तापमान २००८ मध्ये ९ फेब्रुवारी रोजी ३.५ अंश इतके नोंदले गेले. नीचांकी तापमान आणि त्याचा दिवस पाहिल्यास तो एखादा अपवाद वगळता उर्वरित सर्व नवीन वर्षांतील पहिल्या अथवा दुसऱ्या महिन्यातील असल्याचे दिसते. २०१० मध्ये हंगामातील नीचांकी म्हणजे ५.४ अंशाची नोंद २१ डिसेंबरला झाली आहे. २०१२ मध्येही ही पातळी डिसेंबरच्या अखेरीस गाठली गेली आहे. पुढील काळात यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती. यामुळे या वर्षी दहा अंशावर आलेले तापमान आणखी किती खाली जाईल याबद्दल सर्वाना उत्सुकता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा