लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: कॅनडा कॉर्नर ते भोसला प्रवेशद्वार हा कॉलेज रोड आणि जुना गंगापूर नाका ते जेहान सर्कल या गंगापूर रस्त्याला जोडणाऱ्या पाच रस्त्यांच्या चौफुल्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या क्षेत्रात चार सिग्नल असूनही कोंडीचा प्रश्न जटील होत असल्याने पुणे शहराच्या धर्तीवर अभ्यास करून गंगापूर रस्ता आणि कॉलेज रोडवर एकेरी वाहतूक करावी, असा उपाय राष्ट्रवादी काँग्रेसने वाहतूक पोलिसांना सूचविला आहे.

या बाबतचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली किशोर शिरसाठ यांनी सहायक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांना दिले आहे. कॉलेज रोड आणि गंगापूर रोड परिसरात मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालये, विविध शिकवणी वर्ग, बँका, हॉटेल, मंगल कार्यालय, रुग्णालये व व्यावसायिक आस्थापना आहेत. त्यामुळे या भागात सकाळपासून ते रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात रहदारी असते.

हेही वाचा… जळगाव : वाळूमाफियांची मुजोरी; यावलला मंडळ अधिकार्‍यांवरील हल्ल्याचा निषेध

कॉलेजरोड व त्याला संलग्न असणाऱ्या गंगापूर रोड यांना जोडणाऱ्या पाच रस्त्यांच्या चौफुल्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. त्या ठिकाणाहून वाहनधारकांना बाहेर पडणे मुश्कील होते. परिसरात वाहनांच्या रांगा लागतात. पादचाऱ्यांना परिसरातून मार्गक्रमण करणे अवघड ठरते. या संपूर्ण भागात जवळपास चार सिग्नल असूनही वाहतूक कोंडी आटोक्यात येत नाही. किंबहुना तिच्यात दिवसागणीक भर पडत असल्याकडे राष्ट्रवादीने लक्ष वेधले आहे.

हेही वाचा… धुळे : अंगणवाडी भरतीत भ्रष्टाचार – ठाकरे गटाचा आरोप, नव्याने प्रक्रियेसाठी विभागीय उपायुक्तांना घेराव

शहरातील इंदिरानगर, पाथर्डी-वडाळा गाव-टाकळीमार्गे संभाजी नगर रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनाची रहदारी असते. या मार्गावर मोठी लोकवस्ती असून येथे शाळा, महाविद्यालये, रुग्णालये आहेत. या मार्गावर वारंवार अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी पक्षाने वेळोवेळी आंदोलने व निवेदने दिली आहेत. याबाबत प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नसल्याची बाब चर्चेवेळी शहराध्यक्ष ठाकरे यांनी वाहतूक शाखेचे सहायक पोलीस आयुक्त जाधव यांच्यासमोर मांडली.

प्रत्यक्षातील स्थिती आणि उपाय कसा?

गंगापूर रोड व कॉलेज रोडवरील वाहतूक कोंडीवर तातडीने तोडगा काढण्यासाठी पुण्यातील जी. एम. रोड, लक्ष्मी रोड आणि इतर रस्त्याप्रमाणे जुना गंगापूर नाका ते जेहान सर्कल आणि कॅनडा कॉर्नर ते भोसला प्रवेशद्वार हे दोन्ही रस्ते एकेरी (वन- वे) करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या दोन्ही प्रमुख रस्त्यांना जोडणारे रस्ते म्हणजे विद्या विकास चौक ते बिग बाजार चौक, तसेच केबीटी चौक ते बीवायके कॉलेज सिग्नल, प्रसाद सर्कल ते कृषीनगर चौक, शहिद चौक ते मॉडेल कॉलनी चौक, जेहान सर्कल ते भोसला चौक असे रस्ते आहेत. त्यामुळे गंगापूर रोड आणि कॉलेज रोडवरील एकेरी वाहतूक सोयीस्कर होईल, याकडे लक्ष वेधण्यात आले. दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक एकेरी झाल्यास कोंडी सुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The ncp has suggested that one way transport should be done due to the college road gangapur road is facing a traffic jam in nashik dvr
Show comments