मनमाड: मनमाडकरांची जीवन वाहिनी ठरणारी आणि शहराला कायमस्वरुपी पाणी पुरवठा होऊ शकेल अशा ६०० कोटी रुपये खर्चाच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजनेची नुकतीच चाचणी यशस्वी झाली.
शासनाने सुमारे ६०० कोटी रुपये खर्चाच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण-मनमाड पाणी पुरवठा योजनेला मंजुरी दिली. दीड वर्षापासून या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम कशाप्रकारे सुरू आहे. याची पाहणी करण्यासाठी आ. सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली मनमाड शहरातून करंजवण येथे जाण्यासाठी खास सुविधा करण्यात आली होती. त्याद्वारे नागरिकांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन या योजनेची पाहणी केली होती. ती योजना आता अंतिम टप्प्यात आली आहे.
योजनेंतर्गत शहरात भारत नगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या करंजवण येथून गुरूत्वाकर्षणाने कोणतीही गळती न होता आलेले पाणी भरून चाचणी करण्यात आली. ती यशस्वी झाली. त्यामुळे लवकरच मनमाडकरांना करंजवण- मनमाड पाणीपुरवठा योजनेतून नियमित पाणीपुरवठा होणार आहे.
सध्या शहरातील पाणी वितरण योजनेंतर्गत जलवाहिनी व सर्व १२ टाक्या त्याद्वारे जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही दिवसातच ते पूर्ण होईल. आणि त्याद्वारे मनमाडकरांना करंजवणचे पाणी मिळण्यास सुरूवात होईल.