लोकसत्ता वार्ताहर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धुळे: सॅनिटरी पॅडची वाहतूक करीत असल्याचा बनाव करून बनावट दारूची वाहतूक करताना पोलिसांनी दोघांना पकडले. त्यांच्याकडून सात लाख ८१ हजार ८० रूपये किंमतीची देशी-विदेशी दारू,सॅनिटरी पॅड,दोन मोबाईल व मालमोटार असा सुमारे १८ लाख ४४ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा अधीक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने ही कारवाई केली. यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्वी (ता.धुळे) कडून धुळ्याकडे येणारी संशयास्पद मालमोटार पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधान (ता.धुळे) शिवारात अडविले. यावेळी वाहन चालक अर्जून बिंद (वय-२४ रा. शेखाही,ता. शहागंज जि. जौनपूर, उत्तरप्रदेश) व सोमनाथ कोळी (26, रा. खामखेडा, शिरपूर जि. धुळे ) यांच्याकडे वाहनातील मालाबाबत विचारपूस करण्यात आली.वाहनामध्ये सॅनिटरी पॅड असल्याचे सांगून तशी पावती दोघांनी पोलीसांना दाखविली.

हेही वाचा… नाशिकमध्ये १५ पेक्षा अधिक ठिकाणी आयकरचे छापे; बांधकाम व्यावसायिकांसह संबंधित कार्यालयांची तपासणी

तथापि पोलीसांनी वाहनामधील मालाची प्रत्यक्ष तपासणी केली असता सात लाख ८१ हजार ८०० रूपये किमतीच्या देशी-विदेशी कंपनीच्या दारूचे एकूण २०५ खोके आढळले. या खोक्यांमध्ये सहा हजार ८०४ नग बाटल्या आढळल्या. या शिवाय ४० हजार ८०० रूपये किंमतीचे बियरचे २० खोके आढळले. या कारवाईत पोलीसांनी १२ हजार रूपये किंमतीच्या सॅनिटरी पॅडच्या १२० गोण्या आणि दहा हजार रूपये किंमतीचे मोबाईल संच तसेच दहा लाख रूपये किंमतीची मालवाहू आयशय असा एकूण १८ लाख ४४ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

हेही वाचा… धुळे: चारचाकी वाहने चोरणाऱ्या दोघांना अटक

ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड व अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब सुर्यवंशी, संजय पाटील, संतोष हिरे, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, योगेश जगताप व किशोर पाटील यांच्या पथकाने केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The police caught two accused while transporting fake liquor on the pretense of transporting sanitary pads in dhule dvr