लोकसत्ता वार्ताहर
मनमाड: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. अर्ज माघारीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर झालेली हाणामारी गाजली असतांनाच आता या निवडणुकीसाठी मतदानाचे स्थळ हे शहराच्या एका टोकाला बाजार समितीपासून दोन किलोमीटर अंतरावर ठेवण्यात आले आहे. त्याची वेगळी चर्चा सुरू झाली आहे. सोसायटी व ग्रामपंचायत गटातील अंतर्धान पावलेल्या बहुतांश मतदारांची इगतपुरीतील अलिशान ठिकाणी बडदास्त ठेवली गेली आहे. अशा मतदारांना एकाच वेळी मतदानाला आणले जाईल. संबंधितांच्या बस व वाहनांचा विचार करून मोकळे मैदान असणारे केंद्र निवडल्याची चर्चा रंगली आहे.
याआधी मतदानाची तारीख २८ एप्रिल होती. ती ३० एप्रिल करण्यात आली. त्यानंतर मतमोजणीची तारीख सर्व ठिकाणी ३० असतांना मनमाड बाजार समितीसाठी मात्र एक मे ठेवण्यात आली आहे. आता रंगली आहे ती ठिकाणाची चर्चा.
आणखी वाचा-कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक, नऊ पैकी पाच बाजार समित्या बिनविरोध
मनमाड नगरी ही वेगळी असल्याचे नेहमी म्हटले जाते. ते येथील जागरूक राजकारण्यांमुळे. राज्यातील कोणत्याही बदलत्या राजकारणाचे पडसाद हे मनमाड शहरात सर्वप्रथम पडतात. आताही तसेच घडले आहे. बाजार समिती स्थापन होऊन ३८ वर्षे झाली. अजूनही अनेक संचालक हे अनेकदा फेरनिवड झालेले आहेत. तर काही वारसा हक्काने जणू उमेदवारी करीत निवडून येत आहेत. पण बाजार समितीच्या समस्या मात्र स्थापन झाल्यापासून जशा आहे तशाच आहेत.
३० एप्रिलला होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मनमाड कृउबा निवडणुकीत विद्यमान शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनलने कपबशी ही निशाणी घेतली आहे. तर त्याविरूध्द अनिल आहेर, संजय पवार, राजेंद्र देशमुख, पंकज भुजबळ, जगन्नाथ धात्रक या पाचही माजी आमदारांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी प्रणित परिवर्तन पॅनलने छत्री ही निशाणी घेतली आहे. या निवडणुकीत सोसायटी गटातील ११ जागांसाठी २५ उमेदवार, ग्रामपंचायत गटातील चार जागांसाठी १०, व्यापारी गटातील दोन जागांसाठी चार तर हमाल मापारी गटातील एका जागेसाठी दोन असे एकूण १८ जागांसाठी ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
आणखी वाचा- मनपा प्रवेशव्दाराला कुलूप लावणार, अधिकाऱ्यांना काळे फासणार- आमदार फारुक शहा यांचा इशारा
मतदारांना कित दर, याची लाखालाखांची उड्डाणे सुरू आहेत. तर सोसायटी व ग्रामपंचायत गटातील ८० टक्के मतदार हे अज्ञातस्थळी हलविण्यात आल्याची चर्चा आहे. मतदारांना इगतपुरीनजिकच्या निसर्गरम्य ठिकाणाजवळील पंचतारांकीत सुखसोयींनीयुक्त ठिकाणी ठेवल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर ३० तारखेला मतदानाच्या दिवशी तसेच एक मे रोजी मतमोजणीच्या वेळी मोठे मोकळे मैदान लागण्याची शक्यता गृहीत धरून निवडणूक निर्णय अधिकार्यांनी ऐनवेळी मतदानाचे ठिकाण आता बाजार समिती पासून दोन किलोमीटरवरील मनमाड-येवला रस्त्यावरील कॅम्प विभागातील सेंट झेवियर्स हायस्कूल हे निवडले असून मतमोजणीही दुसर्या दिवशी त्याच ठिकाणी होणार आहे.
वाहनांसाठी अट्टाहास का ?
मतदान आणि मतमोजणीचे ठिकाण एवढ्या लांब का ठेवण्यात आले, त्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मतदानाच्या दिवशी बाहेरगावी कॅम्प लावून ठेवण्यात आलेल्या सोसायटी गटांतील २९५ मतदारांना घेऊन येणार्या सुमारे १० गाड्या तर ग्रामपंचायतीच्या २१० मतदारांसाठीच्या सात बस, व्यापारी गटांतील १४७ मतदार व हमाल मापारी गटांतील १३५ मतदारांना मतदानासाठी घेवून येणार्या शंभरावर चारचाकी गाड्यांच्या ताफ्याला तेवढेच मोठे वाहनतळ हवे म्हणून मतदानासाठीचे ठिकाण हे वरीलप्रमाणे दूरदृष्टी ठेवून निवडण्यात आले आहे. तेथे मोकळे मैदान असून त्या ठिकाणीही वाहनतळाची व्यवस्था होवू शकेल, असा विश्वास निवडणूक निर्णय अधिकार्यांना वाटत असावा. त्यामुळेच सेंट झेवियर्स हायस्कूल या केंद्रावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
मनमाड बाजार समिती निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीसाठी मनमाड कॅम्प विभागातील सेंट झेवियर्स हायस्कूल हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. -सिध्दार्थ मोरे ( निवडणूक निर्णय अधिकारी)