मालेगाव : बांगलादेशात हिंदुंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवारी शहरात पश्चिम भागात बंद पाळण्यात आला. यानिमित्ताने रामसेतू पुलापासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. हातात निषेधाचे फलक घेत मोर्चात सामील झालेल्या आंदोलकांनी घोषणाबाजी केली.
विविध हिंदू संघटनांच्या वतीने या बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शहरातील संगमेश्वर, मालेगाव कॅम्प, सोयगाव, सटाणा नाका, सराफ बाजार, गुळ बाजार, भाजी मंडई आदी भागात बंदचा परिणाम जाणवला. बंदमुळे बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला. मुस्लिमबहुल पूर्व भागात मात्र सर्व व्यवहार सुरळीत होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहरातील शाळा, महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली होती. बांगलादेशमधील हिंदुंवरील अत्याचारांच्या निषेधार्थ हिंदू संघटनांच्या वतीने येथील रामसेतू पुलापासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांना निवेदन देण्यात आले.
हेही वाचा >>>कोलकाता घटनेनंतर स्वसंरक्षणासाठी परिचारिकांना मिरची पूड पाकिटांचे वाटप
बांगलादेशातील बंड हे आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा भाग असून पाकिस्तान,चीन व अमेरिका असे देश त्यात गुंतले असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तेथील शासक शेख हसीना यांची भारताशी असलेली जवळीक सहन न झाल्यामुळेच बंडाचे कारस्थान रचण्यात आल्याचे नमूद करत बंडानंतर हिंदुंवर अत्याचार करणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलास नाशिकमध्ये कालव्याचे स्वरुप, तोडगा कसा निघणार?
पोलिसांची दक्षता
मालेगाव बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस दलातर्फे संवेदनशील भाग आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांवर विशेष लक्ष देण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या नेतृत्वाखाली पाच उपअधीक्षक, १६ निरीक्षक, ४६ सहायक व उपनिरीक्षक, ४५० पोलीस, ७० महिला पोलीस यांच्यासह राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, चार दंगा नियंत्रक पथके असा फौजफाटा शहरात तैनात करण्यात आला. बंदच्या निमित्ताने पोलीस दलाच्या वतीने समाज माध्यमांवरही करडी नजर ठेवण्यात आली. दोन धर्मात तेढ निर्माण होईल, असे कोणतेही छायाचित्र, चित्रफित वा संदेश प्रसारित करू नये तसेच अफवा पसरविण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले.