लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव: चोपडा रस्त्यावरून यावल शहरात येणारे अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर महसूल पथकाने शुक्रवारी मध्यरात्री पकडले. या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहे. जिल्ह्यातील मुख्य नद्यांसह इतर नदीपात्रातून अजूनही अवैध वाळू उत्खनन, उपसा सुरू असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

यावल शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात वाळूमाफियांनी आपले जाळे पसरविले आहे. शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध मार्गाने उपसा करून साठवणूक केलेल्या वाळूची छुप्या मार्गाने प्रतिदिन सुमारे २५-३० ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणावर वाहतूक करण्यात येत आहे. महसूलच्या वरिष्ठ पातळीवर अवैध मार्गाने वाळू तस्करी करणार्‍यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. तालुक्यात अवैध वाळू वाहतूक रोख्यासाठी महसूल विभागातर्फे पथके नियुक्त करण्यात आली आहेत. ही पथके सक्रिय झाली आहेत.

हेही वाचा… केळी उत्पादकांच्या समस्या सोडवा; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

शुक्रवार रात्री ११ ते १२ या वेळेत महसूल विभागाच्या पथकाला अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून यावल, फैजपूर, भालोद येथील मंडळ अधिकारी, हिंगोणे, डोंगरकठोरा, दहिगाव, अंजाळे, अकलूद, न्हावी प्रगणे यावल येथील तलाठी यांच्या पथकाने चोपडा रस्त्यावरून येणारे अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर यावल शहरातील नायरा पेट्रोलपंपासमोर पकडले. विनापरवाना वाळू वाहतूक केली जात असल्याचे सांगण्यात आले.कारवाईत जप्त केलेला डंपर यावल येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. डंपरचालकासह मालकाविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार असून, यापुढेही तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात धडक मोहीम सुरू राहणार असल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The revenue team caught a dumper transporting illegal sand in yawal jalgaon dvr