दीपक महाले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव : जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर मतदारसंघात एकीकडे भाजप उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतला असताना महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि ठाकरे गटाकडून अजूनही उमेदवार ठरलेले नाहीत. या दोन्ही ठिकाणी मविआला सर्वदृष्टीने संपन्न उमेदवार हवे आहेत.

जिल्ह्यातील शरद पवार गटाकडून रावेरसाठी आणि शिवसेना ठाकरे गटाकडून जळगावसाठीचा उमेदवार अजूनही ठरला नाही. भाजपच्या तुल्यबळ उमेदवारांना टक्कर देईल, असे उमेदवार महाविकास आघाडीला मिळत नसल्याची स्थिती आहे. ठाकरे गटाला निवडणुकीसाठी भासणारी आर्थिक चणचण हे एक कारण उमेदवार न ठरण्यामागे असल्याचे सांगितले जात आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी सहा विधानसभा मतदारसंघांतील जनसंपर्क, खर्चाची तयारी हे प्रमुख निकष पूर्ण करणारा उमेदवार ठाकरे गटाला अजून मिळालेला नाही. निवडणुकीचा निम्मा खर्च पक्षाने करावा, असा प्रस्तावही ठाकरे गटातील काही इच्छुकांकडून  देण्यात आला. परंतु, निवडणुकीचा सर्व खर्च करणारा उमेदवार पक्षाला हवा असल्याचे कळते.

हेही वाचा >>>धुळ्यात मतांच्या ध्रुवीकरणाचा भाजपचा प्रयत्न

चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत हे तळ ठोकून आहेत. ते जळगाव लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील महाविकास आघाडीतील घटकपक्षांतील नेते, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहेत. उमेदवार जाहीर झाले नसले, तरी पक्षचिन्ह मशाल हेच असल्याने प्रचार सुरू करण्यात आला असून, उमेदवाराचे नाव व चेहरा हे दुय्यम असल्याचे सावंत यांनी सांगितले.

शरद पवार गटाकडूनही रावेर मतदारसंघातील उमेदवार निश्चित झालेला नाही. रावेरमधून भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी उमेदवारी मिळाल्याचा दावा केला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना दिल्या असल्याचे संतोष चौधरी यांचे पुत्र सचिन चौधरी व त्यांचे बंधू अनिल चौधरी यांनी सांगितले आहे. परंतु, अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही. रावेरमधून शरद पवार गटाकडून उमेदवार निश्चित होत नसल्याने काँग्रेसकडूनही पुन्हा ही जागा खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेली अनेक वर्षे काँग्रेसने रावेरची जागा लढली आहे. विजयाची खात्री असलेला लेवा समाज व मराठा समाजाचा सक्षम उमेदवार काँग्रेसकडे असल्याचा दावा केला जात आहे. यातूनच आता पुन्हा रावेरच्या जागेवरून काँग्रेस व शरद पवार गटात कलगीतुरा रंगला आहे. जिल्ह्यतील काँग्रेसचा एकमेव आमदार रावेर मतदारसंघातच आहे. काँग्रेसचे महानगराध्यक्ष श्याम तायडे यांनी, रावेरची जागा मिळाल्यास शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या मदतीने ही जागा सहज जिंकू, असा दावा केला आहे.

हेही वाचा >>>मेळघाटात कारची दुचाकीला धडक, चार जण ठार

जळगावसाठी पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार आहेत. लक्ष्मी प्रसन्न असलेल्या उमेदवारांचा शोध घेतला जात असल्याची चर्चा म्हणजे अफवा आहे. मलाही उमेदवारीबाबत वरिष्ठांकडून विचारणा झाली होती. मात्र, जळगावची जागा मराठा समाजासाठी सोडण्यात आल्यामुळे नकार दिला. प्रचारसाहित्यांसह इतर काही कारणास्तव उमेदवार जाहीर केला जात नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच उमेदवार जाहीर करतील.- विष्णू भंगाळे (जिल्हाप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष)

रावेरच्या जागेसाठी पक्षाकडे आमदार शिरीष चौधरी, मलकापूरचे राजीव एकडे, माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष सलीम पटेल, भुसावळचे नीलकंठ फालक, प्रतिभा शिंदे हे तुल्यबळ उमेदवार आहेत. शरद पवार गटाकडे उमेदवार नसेल तर काँग्रेस लढण्यास तयार आहे. आम्ही प्रदेश समितीकडे रावेरच्या जागेचा प्रस्तावही दिला आहे. ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्याशीही चर्चा झाली आहे. – प्रदीप पवार (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस, जळगाव)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The shiv sena thackeray faction has not yet decided its candidate in the jalgaon constituency amy