शासकीय वैद्यकीय सेवेकडे रुग्णांची पाठ
सर्वसामान्य तसेच दारिद्रय़ रेषेखालील रुग्णांसमोर पैशांअभावी वैद्यकीय उपचाराच्या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी सरकारने जिल्हा, तालुका, गाव पातळीवर त्रिस्तरीय यंत्रणा उभी करत शासकीय रुग्णालये सुरू केली आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयासह तालुक्यातील काही रुग्णांलयांमध्ये औषधसाठय़ाचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे औषधे बाहेरून विकत घेण्याची सूचना केली जाते. यामुळे रुग्णांच्या अडचणीत भर पडली असून अनेकांनी सरकारी आरोग्य सेवेकडे पाठ फिरवली आहे. मात्र आरोग्य विभागाने औषधसाठा मुबलक स्वरूपात असल्याचा दावा केला आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात साथीजन्य, संसर्गजन्य यासह अन्य काही दुर्धर आजारांवर औषधोपचार केले जातात. रुग्णालयाच्या बाह्य़ रुग्ण विभागात सर्दी, खोकला, ताप या साथीजन्य आजारांवरील रुग्णांना तपासून काही औषधे देण्यात येतात. या शिवाय, एचआयव्ही किंवा एड्सग्रस्त रुग्णांनाही या ठिकाणी एआरटी केंद्रातून औषधे पुरविली जातात. रुग्णांवर उपचार सुरू असताना काही वेळा प्रतिजैविके बाहेरून मागविण्या संदर्भात डॉक्टरांकडून चिठ्ठी दिली जायची. बाकी औषधे नियमितपणे रुग्णालयाच्या औषध विभागातून मिळत होती. तालुका पातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामीण रुग्णालयातही वेगळी अवस्था नाही. दोन महिन्यांपासून सर्दी, खोकल्यासह, लहान मुलांना देण्यात येणाऱ्या जीवनसत्वाच्या गोळ्या, यासह काही महत्वाच्या औषधांची कमतरता असून ती बाहेरून विकत आणण्याची वारंवार सूचना केली जात आहे. जिल्हा रुग्णालय सर्दी, खोकला यासह अन्य साथीच्या आजारांवर देण्यात येणाऱ्या औषधांचा तुटवडा असून रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितले जात असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मान्य केले. या बाबत वारंवार सूचना केली जात आहे. मात्र हा औषधसाठा वरिष्ठ स्तरावरून निविदा पाठवून येत असल्याने या कामात अडथळे येत असल्याचे ते म्हणाले. ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात याहून बिकट स्थिती आहे. काही ठिकाणी आरोग्य अधिकारी नसतांना प्रभारी आरोग्य अधिकारी किंवा अन्य वैद्यकीय पथकाच्या आधारे तेथे सेवा देत असतांना औषधांचा प्रश्न समोर येत आहे. इगतपुरी, घोटी, त्र्यंबक यासह अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्रासपणे औषधे बाहेरून आणण्यास सांगितले जात आहे. अतिसार, निमोनिया यासह अन्य काही आजारांवर ज्या वेळी सलाईन दिले जाते, त्यातून दिली जाणारी इंजेक्शन बाहेरून मागविण्यात येतात. मुळात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मुख्य गाव यात बरेच अंतर आहे. औषध बाहेरून आणण्यापेक्षा ती काही मैलांचे अंतर पार करत आणणे अनेकांना त्रासदायक ठरत आहे. यामुळे वाहतूक खर्च, मानसिक त्रास सहन करण्याऐवजी अनेक रुग्णांनी सरकारी रुग्ण सेवेला सोडचिठ्ठी देणे योग्य मानले. या स्थितीत आरोग्य विभागाने मात्र मुबलक स्वरूपात औषधसाठा उपलब्ध असल्याचे सांगितले.
रुग्णांनी मानसिकता बदलण्याची गरज
जिल्हा रुग्णालयासह अन्य ठिकाणी मुबलक स्वरूपात औषधसाठा आहे. मात्र रुग्णांची व वैद्यकीय अधिकाऱ्यांची एखाद्या विशिष्ट ‘ब्रॅण्ड’वर विशेष श्रद्धा आहे. ताप म्हटला की क्रोसिनची गोळी अनेकांना अपेक्षित असते. त्याला पॅरासिटेमॉल पर्याय असू शकतो हे अनेकांच्या गावी नाही. तसेच अनेक वैद्यकीय अधिकारी खासगी रुग्णालयात काम करत असल्याने औषध प्रतिनिधींनी दिलेली औषधे त्यांना महत्त्वाची वाटतात. यामुळे त्यांचाही एका विशिष्ट औषधांसाठी आग्रह कायम आहे. वास्तविक सरकारने सर्दी खोकल्यासाठी पातळ औषधाऐवजी आता गोळ्या देण्यास सुरुवात केली. पातळ द्रव्यात अल्कोहोलचे प्रमाण जास्त असल्याने काहींना त्याचे व्यसन जडत आहे. वरिष्ठ पातळीवरून योग्य पद्धतीने औषधे पुरविली जात आहेत.
-डॉ. सुरेश जगदाळे (जिल्हा शल्य चिकित्सक)