लोकसत्ता वार्ताहर
धुळे: अवसायनात निघालेल्या यावल-सावदा (ता.रावेर) येथील एका पतसंस्थेचा गाळा आणि अनामत रक्कम तक्रारदाराच्या नावे करून देण्यासाठी पाच लाखाची लाच स्वीकारताना धुळे येथील सहकारी संस्थचे विशेष लेखापरीक्षक तथा संबंधित पतसंस्थेचे अवसायक सखाराम ठाकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात ताब्यात घेतले. धुळे मध्यवर्ती बस स्थानकाच्या आवारात ही कारवाई झाली.
ठाकरे हे अवसायनात निघालेल्या यावल-सावदा (ता.यावल) येथील महालक्ष्मी सहकारी नागरी पतसंस्थेचे अवसायक आणि जळगाव भूविकास बँकेचे अतिरिक्त कार्यकारी विशेष लेखा परीक्षक तसेच धुळे येथे सहकारी संस्थाचे (प्रक्रिया) विशेष लेखा परीक्षक म्हणून काम पाहात आहेत. राजे छत्रपती संभाजी राजे व्यापारी संकुलातील गाळा घेण्यास उत्सुक असलेल्या तक्रारदाराने ठाकरे यांच्याशी संपर्क साधला होता. पतसंस्थेचा गाळा आणि गाळ्यासाठी भरण्यात आलेली सुरक्षा अनामत रक्कम आपल्या नावे करून देण्याची प्रशासकीय प्रक्रिया करावी, अशी विनंती अवसायक म्हणून ठाकरे यांच्याकडे केली होती. तत्पूर्वी तत्कालीन प्रशासक अशोक बागूल यांनी तक्रारदाराकडून संबंधित गाळ्यासाठीची सुरक्षा अनामत म्हणून तीन लाख ८५ हजार रुपये रोखीने भरून घेतले.
हेही वाचा… पेपर फुटला की कॉपी? तलाठी भरती परीक्षेला पहिल्याच दिवशी गालबोट
ताबा पावती व प्रतिज्ञापत्रही लिहून देत व्यापारी गाळ्याचा ताबाही दिला. परंतु, या मोबदल्यात तत्कालीन प्रशासक बागूल यांनीही तक्रारदार यांच्याकडे तीन लाख रुपयांची मागणी केली होती. या रकमेची पूर्तता झाली नाही म्हणून बागूल यांनी संस्थेची अनामत रक्कम तक्रारदाराच्या नावे वर्ग होण्याबाबतचे काम करून दिले नाही. दरम्यान, बागूल यांची बदली झाली आणि या संस्थेचे अवसायक म्हणून ठाकरे यांची नियुक्ती झाली. या खंडित प्रक्रियेच्या पूर्ततेसाठी नवे अवसायक ठाकरे यांना सावदा नगर परिषदेकडे पत्रव्यवहार करावा लागणार असल्याने तक्रारदाराने ठाकरे यांच्याशी संपर्क साधला.
हेही वाचा.. नाशिकमध्ये आज उद्योगांबाबत मंथन
ठाकरे यांनी या कामाच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांची मागणी केली. वैतागलेल्या तक्रारदाराने या संदर्भात अवसायक ठाकरेविरुद्ध धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तक्रारीची सावदा येथे जाऊन खात्री केल्यावर अधिकाऱ्यांनी अवसायक तथा सहकारी संस्थेचे (प्रक्रिया) विशेष लेखापरीक्षक ठाकरे यांच्यावर कारवाईची तयारी पूर्ण केली. १७ ऑगस्टच्या रात्री न धुळे मध्यवर्ती बस स्थानकाच्या आवारात सापळा रचुन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्यासह पोलीस निरीक्षक हेमंत बंडागळेव, रुपाली खांडवी यांनी ठाकरे यांना पाच लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.