नाशिक – शहरातील गावठी मद्य निर्मितीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाघाडी अर्थात वाल्मिकनगर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने अनेक हातभट्ट्या उद्ध्वस्त करीत तीन तस्करांना ताब्यात घेतले. या कारवाईत दीड हजार लिटर गावठी दारुसह सुमारे साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महत्वाची बाब म्हणजे, कारवाईवेळी राजकारण्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तथापि, संबंधितांचा विरोध झुगारून मोहीम तडीस नेण्यात आली.

उत्पादन शुल्कच्या अ विभाग भरारी पथकाने ही कारवाई केली. पोलीस फौजफाटा घेऊन पथकाने संपूर्ण परिसर पिंजून काढला. या कारवाईत गौरव पाटील, मनोज पिंपळसे, हर्षल पाटील या संशयितांना अटक करण्यात आली तर श्याम शिंपी, महावीर कौलकर आणि कैलास पाटील हे पथकाची चाहूल लागताच पसार झाले. शहरात गावठी दारूने पुन्हा डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर, उत्पादन शुल्क विभागाने वाघाडीत ही मोहीम राबविली. अ विभागाने वाल्मिकनगर, संत गाडगे महाराज, कुष्ठधाम, शिशू विहार आणि छत्रपती संभाजी नगर रस्ता आदी भागात मोहीम राबवित अनेक हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या.

हेही वाचा >>>नाशिक: मीटर वाचनाशिवाय अनेकांना सरासरी वीज देयके; अस्पष्ट नोंदींमुळे वाढीव भार

पंचवटी पोलिसांचा बंदोबस्त घेऊन ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एक हजार ५७० लिटर गावठी दारूसह रसायन नष्ट करण्यात आले. या ठिकाणी मद्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोटारीसह संशयितांचे भ्रमणध्वनी, दारू गाळपासाठी लागणारे साहित्य असा चार लाख ४७ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा >>>जळगाव: जलतरण तलावात तरुणाच्या मृत्यूची तहसीलदारांकडून चौकशी

शहरातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. पथक परिसरात दाखल झाल्यावर स्थानिक राजकीय नेत्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. राजकीय वरदहस्ताने या परिसरात गावठी दारुचा व्यवसाय फोफावल्याची चर्चा नेहमी होते. त्याची प्रचिती या कारवाईवेळी आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. तथापि, राजकीय दबावाला भीक न घालता अधिकाऱ्यांनी छापासत्र कायम ठेवले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली अ विभागाचे निरीक्षक योगेश सावखेडकर, दुय्यम निरीक्षक यशपाल पाटील, भावना भिरड, सहायक दुय्यम निरीक्षक मायकल पंडित, जवान विरेंद्र वाघ, राहूल जगताप, विजय पवार व मंगलसिंग जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईसाठी ब विभागाचे निरीक्षक सुनील देशमुख, क विभागाचे जी. पी. साबळे, नाशिक भरारी पथकाचे जयराम जाखेरे व विभागीय भरारी पथकाचे अरूण चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली.

Story img Loader