लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: सध्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर चार गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले आहेत.
नशिराबाद आणि धरणगाव येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळीप्रमुख शेख मुश्ताक (४२), आरिफ शेख (२४), असलम खान (३०, सर्व रा. कुरेशी मोहल्ला) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यासह नशिराबाद, जामनेर, भुसावळ बाजारपेठ, धरणगाव, पहूर, चाळीसगाव शहर, तसेच नशिराबाद, चाळीसगाव येथील रेल्वे पोलीस ठाण्यात आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता.
हेही वाचा…. धुळे भाजपची विशाल कार्यकारिणी; सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न
यासोबतच एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील पोलीस ठाण्यात अमीन शेख (रा. उत्राण, एरंडोल) याच्याविरुद्ध चार गुन्हे तसेच दोन प्रतिबंधक कारवायाही करण्यात आल्या होत्या. तरीही त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने हद्दपारीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. त्याअनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी या चारही गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले.