जळगाव: संवेदनहीन जिल्हा प्रशासनामुळेच केळी उत्पादक पीकविमा नुकसान भरपाईपासून वंचित राहिल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बहुजन मुक्ती पार्टीतर्फे मंगळवारी मुक्ताईनगर तालुक्यात पिंडदान आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील सुमारे ७८ हजार शेतकर्‍यांना तातडीने पीकविम्याची रक्कम द्यावी; अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील तापी-पूर्णा या नद्यांच्या संगमावर मंगळवारी दुपारी जिल्हा प्रशासनाचे पिंडदान घालण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे, बहुजन मुक्ती पार्टीचे प्रमोद सौंदडे, निकिता इंगळे, संजय इंगळे, छोटू पुजारी, हेमंत पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा… आदिवासी कोळी समाजाचे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन; उपोषणकर्त्यांची शोभायात्रा

डॉ. सोनवणे यांनी जिल्हा प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. जिल्ह्यातील ८१ हजार ६४२ हेक्टर क्षेत्रासाठी ७७ हजार ९२० शेतकर्‍यांनी पीकविमा काढला आहे. जून २०२१ च्या शासन निर्णयानुसार लाभार्थी शेतकर्‍यांना गारपीट, चक्रीवादळ, अतिवेगाचे वारे यांची नुकसानभरपाई पंचनाम्यानुसार विमा कालावधी संपुष्टात आल्यानंतर ४५ दिवसांच्या आत अर्थात १५ सप्टेंबरपर्यंत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करणे बंधनकारक होते. २०२३-२४ या वर्षाकरिता नवीन केळीसाठी पीकविमा काढण्यास सुरुवात झाली असली, तरी अजून २०२२-२३ चा पीकविमा शेतकर्‍यांना जिल्हा प्रशासनाच्या संवेदनहीन भूमिकेमुळे मिळाला नाही. पीक पडताळणी का बंद केली, जिल्हा कृषी प्रशासनावर कोणत्या राजकीय नेत्यांचा दबाव होता, असे प्रश्न डाॅ. सोनवणे यांनी उपस्थित केले.