नाशिक: येवला तालुक्यातील दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी साकारलेल्या देवसाने मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी पूर्ण क्षमतेने डोंगरगावपर्यंत पोहोचविण्यासाठी दरसवाडी- डोंगरगाव पोहोच कालवा आणि पुणेगाव-दरसवाडी डाव्या कालव्याचे मातीकाम, बांधकाम, अस्तरीकरण करण्यासाठी २५२ कोटी ७४ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. तथापि, या कामाच्या निविदा प्रक्रियेअभावी काम रखडले होते. आता ही प्रक्रिया पूर्ण झाली असून निविदा प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे या कामाचे कार्यारंभ आदेश निर्गमित होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येवला तालुका हा सतत दुष्काळाच्या छायेत असणारा भाग आहे. तालुक्यातील दुष्काळ हटविण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आजपर्यंत प्रयत्न करण्यात आले आहेत. हे प्रयत्न कधी राजकीय आरोप-प्रत्यारोपातही अडकले. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचा येवला हा मतदारसंघ आहे. त्यांच्या माध्यमातून येवल्यासाठी असलेल्या मांजरपाडा या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील दरसवाडी पोहोच कालवा आणि पुणेगाव डाव्या कालव्याची वहन क्षमता वाढविणे आवश्यक होते. त्यासाठी या कालव्याचे मातीकाम, बांधकाम व अस्तरीकरण करण्याची गरज निर्माण झाली होती. हे काम झाल्यावर पाणी जलदपणे पुढे जाण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे हे काम कधी होते, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. त्यानुसार या कामासाठी यापूर्वीच निधी मंजूर करण्यात आला होता. निविदा प्रक्रिया राबवून कामास सुरुवात व्हावी, यासाठी भुजबळ यांच्याकडून पाठपुरावा सुरु होता.

हेही वाचा… यावल तालुक्यात एकाच क्रमांकाचे दोन डंपर जप्त; १० ब्रास वाळूसाठाही जमा

आता दरसवाडी पोहोच कालव्याचे मातीकाम बांधकाम आणि अस्तरीकरणाचे नुतनीकरण करण्यासाठी १५२ कोटी ९० लक्ष तर पुणेगाव डाव्या कालव्याचे मातीकाम बांधकाम आणि अस्तरीकरणाचे नुतनीकरण करण्यासाठी ९९ लाख ८४ रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून निविदा प्रस्तावास शासनाने मंजुरी दिल्यामुळे या कामाचे कार्यारंभ आदेश निर्गमित होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी डोंगरगावपर्यंत जाऊन येवला तालुक्यातील सिंचन क्षमतेत अधिक वाढ होईल. तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होण्यास त्यामुळे मदत होणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The tender proposal has been approved by the government and the work to reach dongargaon of manjarpada project water from devsa will start dvr